कोकण शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम नामनिर्देशन पत्रे स्वीकारणे व छाननी दरम्यान कालावधीकरिता मनाई आदेश जारी

  

 

अलिबाग,दि.10(जिमाका) :- मा.भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या दि.29 डिसेंबर 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र विधानपरिषदव्दारे कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दि.05 जानेवारी ते दि.12 जानेवारी 2023 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत या निवडणूक कार्यक्रमांतर्गत उमेदवार किंवा त्यांच्या कोणत्याही सूचकाकडून निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचे कार्यालय, पहिला मजला, कोकण भवन नवी मुंबई येथे नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अखेरची तारीख दि.12 जानेवारी 2023 असून नामनिर्देशन पत्राची छाननी दि.13 जानेवारी 2023 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई येथे होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दि.16 जानेवारी 2023 आहे.

त्यानुषंगाने विविध राजकीय पक्ष नामनिर्देशन पत्र सादर करतेवेळी उमेदवाराच्या समर्थनार्थ शक्तीप्रदर्शन करणे, विविध वाहनाचा वापर करणे, घोषणाबाजी करणे यामुळे किरकोळ कारणावरून वाद निर्माण होवून पक्ष कार्यकत्यांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार होते. तसेच रहदारीच्या नियमनात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून सार्वजनिक शांततेचा भंग होण्याची शक्यता आहे.

त्यानुषंगाने  पोलीस उप आयुक्त विशेष शाखा, नवी मुंबई श्री.प्रशांत मोहिते यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (1974 चा क्रमांक 2) च्या कलम 144  द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून या नामनिर्देशन प्रक्रिया कालावधीत उमेदवाराच्या ताफ्यातील जास्तीत जास्त 03 वाहनांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात प्रवेश दिला जाईल. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात जास्तीत जास्त 05 व्यक्तींना प्रवेश दिला जाईल, असा आदेश जारी केला आहे.

हा आदेश दि.10 जानेवारी 2023  ते दि.16 जानेवारी 2023 रोजीपर्यंत (दोन्ही दिवसांचा समावेश) 07 दिवसाच्या कालावधीसाठी लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 कायद्याच्या कलम 188 च्या तरतुदीप्रमाणे शिक्षेस पात्र असेल.

या आदेशाच्या प्रती नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, उरण नगरपरिषद कार्यालयाचे परिसरात दर्शनी ठिकाणी चिकटवून ते प्रसिध्द करण्यात येतील, असे पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई श्री.प्रशांत मोहिते यांनी कळविले आहे.

000000

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक