गुणवत्तापूर्ण शिक्षण ही भारती विद्यापीठाची विशेषता--उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 



 

      अलिबाग,दि.23 (जिमाका):- गुणवत्तापूर्ण शिक्षण ही भारती विद्यापीठाची विशेषता असून हेल्थकेअर क्षेत्रातही भारती विद्यापीठाची वाटचाल उत्कृष्टपणे सुरु आहे, असे गौरवोद्वगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.

             भारती विद्यापीठाच्या सेक्टर 10, खारघर, नवी मुंबई येथील अत्याधुनिक अशा मेडिकव्हर हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते.

               यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनिल तटकरे, मेडिकव्हर समूहाचे अध्यक्ष फेड्रिक स्टेन्मो, भारती विद्यापीठचे कुलपती प्रो.डॉ.शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे सचिव आमदार डॉ. विश्वजीत कदम, माजी खासदार रामशेठ ठाकूर, संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे, प्रशांत ठाकूर, नृपाल पाटील, आनंदराव पाटील, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सच्या कार्यकारी संचालक डॉ.अस्मिता जगताप, भारती विद्यापीठाच्या संचालक सौ.स्वप्नाली कदम, भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ.विलासराव कदम आदि मान्यवर उपस्थित होते.

       उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, हेल्थकेअर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे. कोरोना संकटानंतर हेल्थकेअर क्षेत्रात अधिक काम करण्याची आवश्यकता लक्षात आली त्यानुसार आपली वाटचाल सुरू झाली आहे.  हेल्थकेअर क्षेत्रात देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू करण्यात आला आहे. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग सामान्य जनतेला आरोग्य उपचारांसाठी निश्चित होणार आहे. इतर प्रगतशील देशांच्या तुलनेत भारतात कमी खर्चात उपचार होवू शकतात. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही हेल्थ इन्स्टिट्यूट चे महत्व अनन्यसाधारण आहे. आरोग्य क्षेत्रामुळे अर्थ व्यवस्थेला मोठी चालना मिळत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचे महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून दोन लाखापर्यंतचे हेल्थ इन्शुरन्स गरिबांना मिळत आहे. सामान्य नागरिकांकरिता हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

                   शेवटी उपमुख्यमंत्र्यांनी प्रो.डॉ. शिवाजीराव कदम आणि डॉ.विश्वजीत कदम यांचे विशेष अभिनंदन केले तसेच मेडिकव्हर हॉस्पिटलची मालिका विदर्भातही यावी, यासाठी आवाहन केले. 

             या प्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मेडिकव्हर हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.अनिल कृष्णा, भारती विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. डॉ. शिवाजीराव कदम, मेडिकव्हर समूहाचे अध्यक्ष फेड्रिक स्टेन्मो, कौन्सिल जनरल ऑफ स्वीडन श्रीमती निकपॉल ॲनावारिया, आमदार प्रशांत ठाकूर यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन भारती विद्यापीठ मेडिकव्हर हॉस्पिटलच्या सर्व संबंधितांना शुभेच्छा दिल्या. तर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.

               कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते फित कापून व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक भारती विद्यापीठाचे सचिव आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.    

               यावेळी भारती विद्यापीठ व मेडिकव्हर समूह यांनी एकत्रित केलेल्या कामांची माहिती देणारी ध्वनीचित्रफित सादर करण्यात आली.

              शेवटी  भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ.विलासराव कदम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक