जिल्ह्यातील गावागावात राबविले जाणार “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष”

 

 

अलिबाग,दि.09(जिमाका) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्राने 2023 वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले आहे. याचाच एक भाग म्हणून विभागीय आयुक्त, कोकण विभाग तथा जिल्हाधिकारी रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष-2023 रायगड जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार असून जिल्ह्यातील अतिदूर्गम गावापर्यंत पौष्टिक तृणधान्याची लागवड ते प्रक्रियेपर्यंत मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्ज्वला बाणखेले यांनी दिली आहे.

भारत हा जगातील पौष्टिक तृणधान्य पिकविणारा व नियमित वापर करणारा एक प्रमुख देश आहे. सध्याच्या जीवनपद्धतीमुळे पौष्टिक अशा तृणधान्याचे क्षेत्र व वापर कमी होत असल्याने चालू वर्षी देश ते गावपातळीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. त्यामधून पौष्टिक तृणधान्यांचे आरोग्य विषयक महत्त्व पटवून दिले जाणार आहे. याबाबतची सर्व कार्यवाही कृषी व कृषी संलग्न विभागांमार्फत केली जाणार आहे.  

या अंतर्गत कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, महिला बचतगट, विविध सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने जिल्ह्यात महिनानिहाय विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये जिल्हा व तालुकास्तरीय कार्यशाळा, पीक प्रात्यक्षिके, पीक संग्रहालय, लागवड पद्धती, ग्राम कृषी सभेमध्ये पौष्टिक तृणधान्याबाबत चर्चा व मार्गदर्शन, पौष्टिक तृणधान्य प्रक्रिया बाबत प्रशिक्षण, आहार तज्ञांशी संवाद, विविध शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन, महिला बचतगटांसाठी पाककला स्पर्धा व प्रशिक्षण कार्यक्रम, पथनाट्य इत्यादी माध्यमांतून प्रचार-प्रसिद्धी केली जाणार आहे.

भारतातील कुपोषण समस्या व पोषणमूल्य सुधारण्यासाठी मिलेट चा आहारात वापर पुन्हा एकदा वाढविणे, त्यांची लागवड वाढविणे, त्यांच्या उपयुक्ततेबाबत समाजात जनजागृती करणे अत्यंत जरुरीचे आहे. नवीन पिढीच्या व लहान मुलांच्या आवडीचे पदार्थ जसे की, ब्रेड, बिस्किट, केक, इडली, डोसा, चकली, इत्यादी पदार्थ पौष्टिक तृणधान्यावर प्रक्रिया करुन बनविता येतात. असे पदार्थ बनवून त्यांचा आहारात सामावेश वाढविणे आवश्यक आहे. त्यास तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने मदत होईलच. भारताने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे उचललेले पाऊल हे भारताच्याच नव्हे तर सर्व जगाच्या पोषण आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे.

मिलेट अर्थात बारीक दाणे येणारे, माणसांना, प्राण्यांना आणि पक्षांना खाण्याजोगे पौष्टिक तृणधान्य/भरडधान्य, खरंतर भारताच्या विविध प्रांतात होणारे आणि पूर्वपार चालत असलेले आपले मुख्य अन्न म्हणजे मिलेट होते. ज्वारी, बाजरी, नाचणी, कोदू, वरी, राजगीर, राळ, कांग, सावा हे त्यांचे विविध प्रकार.

मिलेट्स वापरातून मिळणारे आवश्यक पोषकांश- मिलेट्स किंवा पौष्टिक तृणधान्य/ भरडधान्य हे शरीरातील अम्लता कमी करणारे असून ते ग्लुटेन विरहित, अत्यंत पोषक आणि पचनास सुलभ आहेत. मिलेट्स चा ग्लासेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर संतुलित राखण्याचे कार्य तृणधान्य करतात. आहारातील यांच्या वापरामुळे वजन कमी होण्यास मदतच होते. कॅल्शियम, आयर्न, झिंक, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आदी महत्त्वाची शरीरावश्यक घटक द्रव्ये याच्यातून आपल्याला मिळतात. त्याचबरोबर आवश्यक तंतूमय पदार्थ म्हणजे फायबर्स, फॉलिक ॲसिड, विटामिन बी 6, बीटा कॅरोटीन, बी 1 आणि चेतातंतूंचे कार्य अधिक सक्षम बनविण्यास लागणारे लेसिथिन याचे उत्तम स्त्रोत म्हणजे ही तृणधान्ये किंवा मिलेट्स असतात.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक