राजभाषा मराठी....आपला स्वाभिमान...!

 

 

दि.01 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हापासून दि.01 मे हा दिवस मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.  महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल, असे जाहीर करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  वसंतराव नाईक होते. सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात सर्वप्रथम वापर केला तसेच देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली.  महाराष्ट्री या तत्कालीन प्राकृत भाषेचे मराठी भाषा हे आधुनिक रूप आहे. अनेक बोलीभाषा आगरी, कोळी, खानदेशी, वऱ्हाडी, कोकणी, तंजावर, मराठी, कुणबी, आदिवासींच्या विविध समुदायांची मराठी बोली तसेच प्रांताप्रांतांनुसार मराठी भाषेत बदल होतो.  पुस्तकातील प्रमाण मराठी व बोली भाषांमधील मराठी यांच्यात अनेक साम्य व भेद आहेत.

मराठी भाषेच्या जडणघडणीत कविवर्य कुसुमाग्रजांचा फार मोठा हातभार होता. विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसमाग्रज यांनी मराठी भाषेत जीवन लहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल, विशाखा हे काव्यसंग्रह तर दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नट सम्राट, राजमुकुट ही नाटके लिहिली तर वैष्णव जान्हवी कल्पनेच्या तीरावर या कादंबऱ्या लिहिल्या. विशाखा या काव्यसंग्रहाला भारतीय साहित्यातील ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. 1942 साली गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार ही कविता लिहून भारतीय स्त्री, पुरुषांना देशप्रेम व क्रांती करण्यासाठी जागरुक केले.  दैनिक प्रभात मधून कविता प्रसिद्ध झाली. इंग्रजांचे पोलिस दैनिक प्रभातच्या कार्यालयात कुसुमाग्रज यांना पकडण्यासाठी गेले, तेथे रजिस्टर तपासली त्यामध्ये कुसुमाग्रज नाव मिळाले नाही. त्यामुळे कुसुमाग्रजांचा  कारावास टळला. वयाच्या 20 व्या वर्षी नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा, म्हणून सत्याग्रहात सहभागी झाले. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात सक्रीय सहभाग घेतला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात भरवी कार्यामुळेच महाराष्ट्र सरकारने दि.21 जानेवारी 2013 च्या शासन निर्णयानुसार कविवर्य वि.वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरवदिन साजरा करण्याचे निश्चित केले.

  मराठी ही अतिशय सुंदर भाषा आहे. मराठी भाषा मुख्यतः महाराष्ट्र राज्य व गोवा राज्याच्या काही भागात बोलली जाते. जगात 9 कोटी लोक मराठी भाषा बोललात. बोलल्या जाणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील 10 व्या क्रमांकाची भाषा आहे. भारतात बोलल्या जाणऱ्या एकूण भाषांपैकी मराठी तिसऱ्या क्रमांकांची भाषा आहे.  मराठी ही जगातील प्राचीन भाषांपैकी एक भाषा आहे. शालिवाहन शके 934 म्हणजे इ.स.1012 मधील शिलाहार राजा केसी देवराय यांचा प्रधान भईर्जू सेणई यांचा शिलालेख हा सर्वात जुना शिलालेख आहे. संत ज्ञानेश्वरांनी 13 च्या शतकात मराठी  भाषेचा महिमा सांगताना म्हणतात, माझ्या मराठीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंकी तर संत एकनाथ महाराज परखडपणे विचारतात की, संस्कृत वाणी देवे केली तर मराठी काय चोरापासूनी आली? संत तुकाराम, संत नामदेव, संत गोराकुंभार, संत चोखामेळा अशा अनेक संतानी आपल्या साहित्याने मराठी भाषेचे वैभव वाढविले. जीवन जगण्याचा साधा सरळ मार्ग-कममार्ग व ईश्वरभक्ती आपल्या अभंगांतून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवला. स्वातंत्र्यवीर सावरकर, कृष्णाजी केशव दामले, त्र्यंबक बापूजी होंबरे, प्रल्हाद केशव अत्रे, राम गणेश गडकरी, महात्मा फुले, विठ्ठल रामजी शिंदे अशा अनेक कवींनी व लेखकांनी मराठी भाषेत विपुल कविता केल्या, लेखन केले व मराठी भाषेला संपन्न केले. अनेक साज लेऊन मराठी भाषा नटली. महाराष्ट्रावर अनेक वर्षे सुलतानांचे राज्य होते, सुलतानांच्या कारकीदीत मराठी भाषेत फारशी अरबी भाषेतील अनेक शब्द रूढ झाले.  गोवा, वसई, कोर्लई प्रांतावर पोर्तुगीजांनी राज्य केले. त्यामुळे मराठी भाषेत पोर्तुगीज शब्द सामावले छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीयांपासून मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केले व केवळ धर्माचेच नव्हे तर मराठी भाषेचे रक्षण केले.  छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आज आपली मराठी भाषा जिवंत आहे? मराठी  भाषेतील पहिला राजभाषा कोश तयार करवून घेतला या राजभाषाकोशात सुमारे 1 हजार 500 शब्द होते.

ज्या मराठीने आपल्यावर सांस्कृतिक छत्र उभारले, जिणे आपल्याला लहानाचे मोठे केले, या बहुआयामी जगात स्वतःला सिद्ध करण्याची धमक दिली, बळ दिले तिच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा हा महामंगळ दिवस आहे. मराठी ही आपल्यासाठी केवळ एक भाषा नसून ममतेचे, वात्सल्याचे, संस्कारांचे बोल आहेत.    

जागतिकीकरणाच्या स्पर्धेत आपल्या मुलांना आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून शिक्षण देतो. मुले-मुली इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतात व मातृभाषेपासून दुरावतात मराठी बोलता येते,पण लिहिता-वाचता येत नाही. परिणामी मराठी भाषेतील पुस्तके,वर्तमानपत्रे त्यांना वाचता येत नाहीत.  मराठी भाषा टिकवायची असेल, जगवायची असेल तर मराठी पुस्तके, वर्तमानपत्रे वाचली पाहिजेत. घराघरात मराठी भाषा बोलली पाहिजे, आज आपण सर्वच जण असा निश्चय करू की मायबोली जगविण्यासाठी महिन्यात एक तरी मराठी पुस्तक वाचून महाराष्ट्रात घरात तसेच बाहेर म्हणजे परप्रांतीय लोकांशी बोलताना मराठीतच बोलू आग्रह धरू.

 

 

लेखिका :-                                                                                                           

सौ.अनुराधा सुनिल पाटील                                                                                 

सहा.शिक्षिका कों.ए.सो.स रा.तेंडुलकर विद्यालय,रेवदंडा,

ता.अलिबाग, जि.रायगड

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक