सूक्ष्म व लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कार-2022 पात्र उद्योजकांनी अर्ज सादर करण्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे आवाहन

 

 

अलिबाग,दि.25(जिमाका):-  सूक्ष्म लघु उद्योजकांनी सुयोग्य तंत्रज्ञानाची व नवीन उत्पादनाची निवड करावी आणि व्यवस्थापनातील दर्जा व त्यांच्या घटकाची निकोप वाढ व्हावी, यासाठी सूक्ष्म व लघु उद्योजकांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने शासनाने 1985 या वर्षीपासून जिल्हा पुरस्कार योजना कार्यरत केली आहे.  हे पुरस्कार प्रत्येक कॅलेंडर वर्षामध्ये पात्र सूक्ष्म व लघु उद्योग घटकांना देण्यात येतात. यावर्षीच्या पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्या सूक्ष्म लघु उद्योजकांनी विहित अर्ज महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड बाजार समोर, ठिकरुळ नाका, ई-मेल आयडी didicraigad@gmail.com,  अलिबाग येथे सादर करावा तसेच अधिक माहितीसाठी व्यवस्थापक  श्री.एस.यू चकोर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.जी.एस.हरळया  यांनी केले आहे.

      शासनाने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून विजेत्या उद्योजकांची, घटकांची निवड केली जाते. निवड करण्यात आलेल्या उद्योजकांना प्रथम पारितोषिक रुपये 15 हजार, सन्मानचिन्ह तसेच द्वितीय पारितोषिक रुपये 10 हजार, सन्मानचिन्ह देण्यात येते. अधिकाधिक सूक्ष्म लघु उद्योजकांनी त्यांच्या तंत्रज्ञान, कार्यपद्धती, व्यवस्थापन कौशल्य, उत्पादकता आणि उत्पादनातील नाविन्य संशोधन विकास इत्यादीबाबत सुधारणा करावी, यासाठी उद्योजकांना प्रेरित करण्याच्या हेतूने सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करून विजेत्यांना सन्मानित करणे, ही या योजनेमागील भूमिका आहे.

     जिल्हा पुरस्कार योजनेचा लाभ घेण्यासाठीची आवश्यक पात्रता- ज्या घटकांना यापूर्वी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व जिल्हा पुरस्कार मिळालेले आहेत, असे घटक या पुरस्कारास पात्र होणार नाहीत. उद्योग संचालनालयाकडे कमीत कमी मागील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये स्थायीरित्या सूक्ष्म व लघुउद्योग नोंदणी म्हणून नोंदणीकृत झाले असले पाहिजे.  मागील दोन वर्षात सलग उत्पादन करीत असणारे घटक पात्र ठरतील. अर्जदार वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

 ००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक