श्रीराज मेडिकल अॅण्ड हेल्थकेअर सेंटर व ग्रामीण चॅरिटेबल हॉस्पिटलचा लोककल्याणकारी उपक्रम पाली-परळी येथे 39 बेड्सच्या अत्याधुनिक रुग्णालयाचा पायाभरणी समारंभ संपन्न

 

अलिबाग,दि.24(जिमाका):-श्रीमद् राजचंद्र आत्मतत्व रिसर्च सेंटरचे प्रणेते परमपूज्य पप्पाजी यांच्या निष्काम करूणेतून समाज कल्याणार्थ श्रीराज मेडिकल अँड हेल्थकेअर सेंटर व ग्रामीण चॅरिटेबल हॉस्पिटल (एशियाटिक चॅरिटेबल ट्रस्ट) च्या माध्यमातून अत्याधुनिक रुग्णालयाच्या वास्तूचा भूमीपूजन समारंभ गुरुवारी (दि.23 मार्च) रोजी संपन्न झाला. 39 बेड्स असलेल्या या रुग्णालयाचे भूमीपूजन श्री. निलेश मेहता यांच्या हस्ते पाली तालुक्यातील परळी येथे करण्यात आले.

यावेळी एशियाटिक चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी नितीन अजमेरा, हितेन ठक्कर, श्रीमद राजचंद्र आश्रमचे सर्व ट्रस्टी तसेच सुधागड-पालीचे तहसिलदार उत्तम कुंभार, परळी ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश कुंभार, वऱ्हाड जांभूळपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रद्धा कानडे, पांडुरंग झोरे व पंचक्रोशीतील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी निलेश मेहता म्हणाले की, श्रीराज मेडिकल अॅण्ड हेल्थकेअर सेंटरच्या आरोग्य सुविधांची तुम्हाला गरज पडेल अशी वेळच यायला नको. परंतु आवश्यकता पडलीच तर कुटुंबियांना रुग्णाला घेवून शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही, इतके हे रुग्णालय सक्षम व सुसज्ज असणार आहे. शारीरिक आरोग्यासोबत संसारातील सर्व दुःखातून तुम्ही मुक्त व्हावे, तुम्हा सर्वांना आत्मिक सुखाची प्राप्ती व्हावी, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

सुधागड-पाली तालुक्यात हृदयरोगासंबंधी तातडीने करावयाचे अत्याधुनिक उपचार तसेच इतर तातडीच्या आरोग्यसेवा सध्या तरी उपलब्ध नाहीत. अशा वेळी रुग्णाला मोठ्या आजारांच्या किंवा तातडीच्या उपचारांसाठी मुंबईलाच जावे लागते. सुधागड-पाली तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना, आदिवासी बांधवांना हे उपचार परवडणे अशक्य आहे, याचा विचार परमपूज्य पप्पाजींच्या मनात आला व त्यांनी या परिसरात आधुनिक आरोग्य सोयी-सुविधांनी सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला. आज या अत्याधुनिक रुग्णालयाचा पायाभरणी संपन्न झाल्यामुळे आजचा दिवस सुधागडमधील आरोग्यसेवेसाठी बहुमूल्य ठरणारा आहे,असेही त्यांनी म्हटले. घोटवडे गावाचे सरपंच यशवंत झोरे तसेच राहुल गायकवाड, संदेश कुंभार या मान्यवरांनी श्रीराज मेडिकल अॅण्ड हेल्थकेअर सेंटरच्या या कार्याचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

परळी येथे सुरू होणारे तसेच आधुनिक सुविधा प्राप्त करून देणारे हे 39 बेडचे रुग्णालय असणार आहे. ज्यामध्ये डायलिसिस, कार्डिओलॉजिस्ट, फिजिओथेरपी, इमेजिंग आणि डायग्नॉस्टिक्स आदी अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा समावेश आहे. तसेच यात पॅथॉलॉजी लॅब, आधुनिक ऑपरेशन थिएटर, लेबर रूम, आय.सी.यू आणि नवजात शिशू आय.सी.यूचा सामावेश असेल. एक स्वतंत्र आपत्कालीन कक्ष आणि समर्पित रूग्णवाहिका सेवादेखील उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर या रूग्णालयाच्या निर्माणानंतर आजूबाजूच्या गावातील तरूणांना रोजगाराचीही नवीन संधी निर्माण होणार आहे. यामध्ये वॉर्डबॉय, परिचारिका, लॅब टेक्निशियन या पदांचा समावेश आहे.

यावेळी संस्थेच्या 2004 पासूनच्या कार्याचा आढावा उपस्थितांसमोर मांडण्यात आला. यात श्रीराज एज्युकेशन सेंटरमार्फत विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी, गिफ्ट अ व्हिजनच्या प्रकल्पातून पंचक्रोशीतील अनेक गावांतील ग्रामस्थांकरिता मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आतापर्यंत चाळीस हजारांहून अधिक लोकांना विविध आरोग्य सुविधांचा लाभ मिळाला आहे. तसेच दीडशेहून अधिक गावांपर्यंत हा प्रकल्प पोहोचला आहे. 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान, करोना महामारीपासून बचाव करण्यासाठी 6 हजार 726 कुटुंबांना मोफत वैद्यकीय किटचे वाटप करण्यात आले. जनसामान्यांतली करोनाची भीती व गैरसमज दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीपर कार्य करण्यात आले. सध्या श्रीराज मेडिकल अॅण्ड हेल्थकेअर सेंटरमध्ये जनरल फिजिशियन, होमिओपॅथी डॉक्टर, डेन्टिस्ट, कान-नाक-घसा तसेच त्वचारोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ असे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टर गरजू ग्रामस्थांकरिता विनामूल्य सेवा देत आहेत.

श्रीराज मेडिकल अँड हेल्थकेअर सेंटर व ग्रामीण चॅरिटेबल हॉस्पिटल (एशियाटिक चॅरिटेबल ट्रस्ट) यांच्या वतीने प्रशासनाचे, सुधागड-पाली भागातील लोकप्रतिनिधींचे ग्रामस्थांचे तसेच प्रसारमाध्यम प्रतिनिधींचे त्यांनी या सामाजिक उपक्रमास केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले आहेत.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक