रायगड पोलीस कल्याण निधी वृद्धिंगत करण्याकरिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 

अलिबाग,दि.13(जिमाका) :- रायगड जिल्हा पोलीस दलांतर्गत पोलीस कल्याण निधी वृद्धिंगत करण्याकरिता पोलीस महासंचालक, मुंबई यांच्या मान्यतेने दि. 15 मार्च 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता पोलीस मुख्यालय, अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर सागर तरंग या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

      पोलीस कल्याण निधीमध्ये जो निधी स्विकारला जातो, ज्यामध्ये काही दानशूर व्यक्ती आपल्या परीने सहभाग नोंदवितात. या प्राप्त रकमेचा वापर हा पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच त्यांच्या कुटुंबियांकरिता विविध योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता केला जातो. तब्बल 8 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर रायगड पोलीस दलांतर्गत कल्याण निधीकरीता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

       हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश नागरिकांच्या मनोरंजनासोबतच पोलीस कल्याण निधी वृद्धिंगत करून त्यामधील प्राप्त रकमेच्या सहाय्याने पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांच्या कुटुंबियाकरिता विविध लाभदायक योजनांची अंमलबजावणी करणे हे आहे.

      पोलीस पाल्यांकरिता योजना :-

पुस्तक अनुदान- इ. 5 वी ते इ.10 वी महाविद्यालय तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या पोलीस पाल्यांना पुस्तक अनुदान दिले जाते.

एकलव्य योजना :- पोलीस अधिकारी/अंमलदार यांच्या पाल्यांना किंवा पती/पत्नी यांना नवीन उद्योगधंदा करण्याकरिता या योजनेव्दारे आर्थिक मदत केली जाते.

उच्च शिक्षण स्कॉलरशिप :- पोलीस अधिकारी/अंमलदार यांच्या पाल्यांना उच्च शिक्षणाकरिता अग्रिम स्वरूपात अनुदान दिला जातो.

बस्ता अनुदान :- पोलीस अंमलदार यांच्या मुलींना शिक्षण घेण्याकरिता हा अनुदान दिला जातो.

वैद्यकीय अग्रीम :- पोलीस अंमलदार व लिपिक यांना त्यांच्या आजारावरील उपचाराकरिता अग्रिम देण्यात येतो.

गरोदर पोषण व सदृढ बालिका आहार :- महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रसूती काळात तसेच मुलगी झाल्यास अनुदान देण्यात येते.

कुटूंब आरोग्य योजना :-  पोलीस अधिकारी/अंमलदार यांच्या वैद्यकीय उपचाराकरिता.

अंत्यविधी अनुदान व सानुग्रह अनुदान :- सेवेत असताना दिवंगत झालेल्या अधिकारी/अंमलदार यांच्या अंत्यविधीकरिता तसेच तद्नंतर सानुग्रह अनुदान देण्यात येतो.

इतर महत्वाच्या योजना :- वेल्फेअरमार्फत पोलीस मुख्यालय येथे पोलीस दवाखाना, व्यायामशाळा, वाचनालय सुरू करण्यात आले आहेत तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार यांच्याकरिता विविध आरोग्य शिबिर तसेच प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येते. तसेच पोलीस अधिकारी अंमलदार यांच्याकरिता विसावा विश्रांतीगृह, महिला पोलीस अधिकारी/महिला पोलीस अंमलदार यांच्याकरिता विश्रांतीगृह, पोलीस अधिकारी क्लब, पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच त्यांच्या कुटुंबियाकरिता पोलीस सबसिडीपूर्ण कॅन्टीन, पोलीस वेल्फेअर पेट्रोल पंप इ. विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी पोलीस कल्याण निधी मधून करण्यात येते.

              हा कार्यक्रम रायगड जिल्हा पोलीस दलांतर्गत आयोजित असून "साहिल मोशन आर्टस्" यांच्यामार्फत प्रस्तुत केला जाणार असून कार्यक्रमाची तिकीट विक्री माफक दराने सुरू आहे. या कार्यक्रमामध्ये संगीत,नाट्य, नृत्य आणि हास्याची मेजवानी प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येणार असून या कार्यक्रमाव्दारे महाराष्ट्राची लोकपरंपरा जागृत ठेवत मराठमोळया संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी पुरेपूर नियोजन करण्यात आले आहे.

             या कार्यक्रमाकरिता पुष्कर श्रोत्री, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, दत्तु मोरे, श्रमेश, प्रथमेश, मीरा जोशी, नवीन प्रभाकर इ. अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहावयास मिळणार आहे.

             कार्यक्रमाच्या तिकिटाकरिता जिल्ह्यातील नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. या कार्यक्रमाकरिता जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे तसेच रायगड जिल्हा पोलीस परिवारातर्फे करण्यात आले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक