प्रशासनाच्या संवेदनशीलतेमुळे आदिवासी कुटूंबाला मिळाला न्याय…! तहसिलदार विजय तळेकर यांची कौतुकास्पद कामगिरी

 


 

अलिबाग,दि.15 (जिमाका):- पनवेल तालुक्यातील मौजे हेदूटने सर्व्हे नंबर 123/1/ब ही 32 गुंठे जमीन मिळकत अनंता बाळ्या पोकळा या कुटुंबाच्या नावे आहे. अनंता बाळ्या पोकळा यांचे आई-वडील अशिक्षित असल्याचा फायदा घेवून त्यांच्या सोबत सुरेंद्र सिंग आणि त्यांच्या कुटुंबियांनी फसवणूक करून त्या जमीन मिळकतीचे सन 2011 मध्ये अनधिकृतपणे 99 वर्षाचा भाडे करार केला आणि त्या जागेवर अवैधरित्या कब्जा केला.

      आदिवासी जमीन बिगर आदिवासी व्यक्तीच्या नावे होणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्यासाठी काम करणारी एक आदिवासी व्यक्ती हिरामण बुधाजी उघडा यांच्या नावे सन 2016 मध्ये अवैधरित्या खरेदी-विक्रीचा साठे करार करून फसवणूक करण्याचा दुसऱ्यांदा प्रयत्न करण्यात आला. त्या जागेवर सिंग कुटुंबियांनी त्यांच्या कॉरीवर काम करणाऱ्या लोकांसाठी घरे, गाड्या दुरुस्तीसाठी गॅरेज, गाई, म्हशीचा गोठा देखील बांधला आहे, असा अहवाल स्वतः स्थळ पाहणी आणि सखोल चौकशी करून मंडळ अधिकारी श्री.कचरे यांनी सुनावणी दरम्यान सादर केला.

      तसेच पनवेल ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.तुकाराम कोरडे यांनी देखील नि:पक्षपातीपणे चौकशी करून संबंधितांचा जाब-जबाब नोंदविला.  पनवेल तहसिलदार श्री.विजय तळेकर यांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेवून सर्व कागदपत्रांचे व्यवस्थित अवलोकन केले.  सिंग कुटुंबियांचीही बाजू ऐकून घेतली. आणि पुढील तीन महिन्यात सर्व सुनावण्या पूर्ण करून त्या जागेचे हस्तांतरण अवैध असल्याचे स्पष्ट केले आणि केलेले भाडेकरार तसेच साठेकरार अवैध ठरविले.

       सिंग यांच्या कुटुंबियांच्या वतीने बाजू मांडत असलेले वकील ॲड.खुटले यांनी तहसिलदार श्री.विजय तळेकर यांचा  निर्णय मान्य केला. त्या निर्णयानुसार भूमी अभिलेख अधीक्षक प्रतिनिधी श्री.खांडेकर आणि मंडळ अधिकारी श्री.कचरे हे दि. 12 मार्च 2023 रोजी त्या जागेवर मोजणी करण्यासाठी गेले आणि त्यांनी पुढील आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. त्या मोजणीच्या वेळी संबंधित आदिवासी बांधव आणि सिंग कुटुंबियांच्या वतीने हिरामण बूधाजी उघडा उपस्थित होते.

आदिवासी शेत जमिनीवर असलेली सर्व अवैध बांधकामे तोडून ती जमीन शेतीसाठी आदिवासी कुटुंबाला देण्यात येणार आहे, असे तहसिलदार श्री.विजय तळेकर यांनी सांगितले. तर आदिवासी समाजातील पोकला कुटुंब शेवटपर्यंत ठाम राहिले आणि प्रशासनानेही वस्तूस्थिती जाणून घेवून सत्याची बाजू समजून घेतली, म्हणूनच हे यश मिळाल्याची प्रतिक्रिया उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र मढवी यांनी व्यक्त केली आहे.

     पनवेल तालुक्यातील किंवा इतर तालुक्यातील आदिवासी समाजातील व्यक्तीची जमीन भाडे करार किंवा साठे करार करून किंवा इतर कोणत्याही अवैध मार्गाने कब्जा किंवा हस्तांतरण केले असेल तर त्यांनी स्थानिक प्रशासनाशी किंवा आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री.सुधाकर पाटील किंवा अन्य सामाजिक संस्थेच्या कोणत्याही कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक