चवदार तळे, महाड येथील क्रांतीदिनाच्या तयारीचा जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी घेतला आढावा

 


 

अलिबाग,दि.17(जिमाका):- महाड हे ऐतिहासिक शहर असून सोमवार, दि.20 मार्च 2023 या ऐतिहासिक दिवशी आंबेडकर अनुयायी सामान्य जनता व लोकप्रतिनिधी मोठया प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी महाड येथे येत असतात. महाड येथे येणाऱ्या अनुयायांना रेल्वे बस सेवा, पिण्याचे पाणी, सुलभ सुविधा, आरोग्य तपासणी, तात्पुरता निवारा, बस थांबा, वाहन पार्किंग व्यवस्था इ.सुविधा पुरविणे व त्यात समन्वय असणे आवश्यक आहे. याकरिता सामाजिक संघटना व संबंधित शासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय राहण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणा व सामाजिक संघटना यांची एकत्रित बैठक काल दि.16 मार्च 2023 रोजी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात संपन्न झाली.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, सुनिल जाधव, महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, सहाय्यक संचालक आरोग्य डॉ.प्रताप शिंदे, गट विकास अधिकारी वाय.एस.प्रमे, तहसिलदार सुरेश काशिद, महाड पोलीस निरीक्षक एम.पी. खोक, पोलीस निरीक्षक (वाहतूक) रायगड अलिबाग श्रीमती सुवर्णा प्रसाद पत्की, महाड नगरपरिषद मुख्याधिकारी श्री.महादेव शेडगे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे व्यवस्थापक प्रकाश जमदाडे तसेच कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्था, मुंबई चे अध्यक्ष प्रकाश मोरे,सचिव दिपक पवार व राजा आदाटे, शरद मोरे, मोहन सुदाम घाडगे, पत्रकार दिपक पवार आदि मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी महाड येथे येणाऱ्या अंदाजे 2 लाख अनुयायी, लोकप्रतिनिधी व सामान्य जनता यांच्या अनुषंगाने शौचालये, स्वयंसेवक यांच्यामध्ये वाढ करणे, नगरपालिका कर्मचारी व स्वयंसेवक यांना ओळखण्यासाठी ओळखपत्र देण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. स्थानिक प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत व्हिडिओ क्लिप बनवून सामाजिक माध्यमांव्दारे प्रकाशित करण्याच्या सूचना महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती पुदलवाड यांना दिल्या. तसेच महाड पोलीस निरीक्षक एम.पी.खोक यांनी दि.20 मार्च रोजीच्या महाड शहरातील पार्किंग व्यवस्थेबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

समाज कल्याण सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी बैठकीस उपस्थित सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांचे स्वागत करुन बैठकीस सुरुवात केली. आढावा दरम्यान महाड नगरपरिषद मुख्याधिकारी श्री.रोडगे यांनी येणाऱ्या अनुयायांना देण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सुविधा, पाणीपुरवठा सुविधा, स्वच्छता सुविधा याबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्था, मुंबई चे अध्यक्ष व सचिवांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी ही समन्वय आढावा बैठक घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले. शेवटी सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्या संमतीने बैठक संपल्याचे जाहीर केले.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक