माणगाव दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर न्यायालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न माणगाव न्यायालयामुळे पक्षकारांना जलद व योग्य न्याय मिळेल -न्यायमूर्ती अमित बोरकर

 


 

अलिबाग,दि.09(जिमाका):- माणगाव येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाचा उद्घाटन समारंभ रविवार, दि.5 मार्च2023  रोजी माणगाव जिल्हा सत्र न्यायालय परिसरात पार पडला. या न्यायालयामुळे येथील पक्षकारांना जलद व योग्य न्याय मिळेल, असे उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती रायगड जिल्हा अलिबाग अमित बोरकर यांनी सांगितले.

उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती रायगड जिल्हा अलिबाग अमित बोरकर यांच्या शुभहस्ते हा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. सुरुवातीला न्यायालय कक्षाचे उद्घाटन केल्यानंतर राज्यगीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.     

यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शैलजा सावंत, जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश नवनाथ कोले, न्यायाधीश सर्वश्री.फुझळके, साटोटे, पाठारे, निवृत्त न्यायाधीश जहागीरदार, माजी पालकमंत्री आमदार कु.आदिती तटकरे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, माणगाव बार असोसिएशन अध्यक्ष ॲड.महेंद्र मानकर, ॲड. राजीव साबळे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, ॲड.विनोद घायाळ, माणगाव नगरपंचायत नगरसेवक, श्रीवर्धन, महाड, रोहा, बार असोसिएशन सदस्य, वकील, पक्षकार  व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

    माणगाव येथे दि. 6 मार्च पासून दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयाचे कामकाज सुरु होणार आहे. भूसंपादन प्रकरणे, हिंदू विवाह कायद्यांतर्गत दाखल होणारी प्रकरणे, सरकार विरुध्दची प्रकरणे, रक्कम रुपये पाच लाखावरील दावे व इतर प्रकरणांसाठी श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, रोहा व पाली या महसुली तालुक्यांकरिता पक्षकार व वकिलांना प्रकरणे दाखल करण्यासाठी अलिबाग येथे यावे लागत होते. त्यामुळे पक्षकारांना आर्थिक भूर्दंड पडत होता तसेच त्यांचा वेळही वाया जात होता. त्यामुळे या परिसरातील पक्षकार व वकिलांची माणगाव येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर हे न्यायालय सुरु करण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून प्रलंबित होती. श्रीवर्धन म्हसळा, माणगाव, तळा, रोहा व पाली या महसुली तालुक्यांकरिता माणगाव, जिल्हा रायगड येथे दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, माणगाव न्यायालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव मा.उच्च न्यायालयास सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मा.उच्च न्यायालयाने मंजूरी दिली असून त्याबाबतची अधिसूचना विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांचा सिंहाचा वाटा आहे असून या न्यायालयाच्या मंजुरीसाठी खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, ॲड.राजीव साबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असे प्रास्ताविकेत ॲड.महेंद्र माणकर यांनी सांगितले.

      या नूतन न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून श्रीमती ए.एन.नावंदर यांची मा.उच्च न्यायालयाकडून नियुक्तीही करण्यात आली आहे. माणगाव वकील असोसिएशन काम चांगले आहे. त्यांच्या प्रयत्नाचे हे फळ असून या न्यायालयामार्फत कायद्याच्या अधीन राहून योग्य तो न्याय जनतेला देण्यात यावा. जास्तीत जास्त प्रकरणे निकाली लावण्यात यावी. न्यायालयाचे पाच मजली इमारतीसाठी लागणारे सहकार्य माझ्याकडून केले जाईल, असे आपल्या मार्गदर्शनात न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी सांगितले.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक