350 व्या शिवराज्याभिषेक दिमाखदार सोहळ्याची जय्यत तयारी सुरु पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला सविस्तर आढावा

 

 

अलिबाग,दि.05 (जिमाका) :- छत्रपती शिवाजी महाराज यांचा दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात असतो. यावर्षी तारखेप्रमाणे व तिथीप्रमाणे 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड येथे साजरा होणार आहे. त्यानुषंगाने रायगड किल्ला येथे दरवर्षी पेक्षा जास्त संख्येने शिवभक्त तसेच मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने त्यानुषंगाने आवश्यक ते नियोजन करण्याकरिता सोमवार, दि.3 एप्रिल 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व रायगड किल्ला जतन, संवर्धन व विकास आराखडा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री.संभाजी शाहू, छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे हे ऑनलाईन तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाड मुख्याधिकारी महादेव रोडगे, रायगड किल्ला विकास प्राधिकरणाचे श्री.वरुण भामरे तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत यांनी शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमानिमित्त विविध शासकीय विभागांनी करावयाच्या कामकाजाचे पुढीलप्रमाणे निर्देश दिले-

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी किल्ले रायगडावर सभामंडप, स्टेज, हत्तीखाना येथे मंडळ व सोहळयाच्या अनुषंगाने फुलसजावट, लाईट, साऊंड व कार्यक्रमाचे अनुषंगाने इतर व्यवस्था करावी, पावसाच्या दृष्टीकोणातून ताडपत्री व्यव्यस्था करणे, पाचाड धर्मशाळेची दुरूस्ती करणे, बॅरिगेटची व्यवस्था करणे, मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करणे, शिवभक्तांच्या राहण्याच्या दृष्टीने तात्पुरते निवाराशेडची व्यवस्था करणे, पायऱ्यांची दुरूस्ती व पायऱ्यांवर दोर बांधणे नियोजन करणे, महाराष्टद्य विकास मंडळाचे (MTDC) विश्रामगृह दुरूस्ती व ताबा घेणेबाबत कार्यवाही करणे, महादरवाजा येथे लाऊड स्पिकरची व्यवस्था करणे, कार्यक्रमाच्या अनुषंगाने इतर आवश्यक नियोजन व्यवस्था करणे, या कामांबाबत जातीने लक्ष देण्याविषयी पालकमंत्र्यांनी निर्देश दिले.

महाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी रायगड रोप-वे परिसर, गडावरील स्वच्छतेचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे, तसेच चित्त दरवाजा, रोप-वे लोअर स्टेशन, व इतर ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे,आवश्यक पाण्याचे टँकर उपलब्ध करून घेणे, पाचाड येथे असलेल्या विहिरी कार्यक्रमापूर्वी पाण्याने भरून ठेवणे व इतर पाईप लाईनची तपासणी करणे आवश्यक असल्यास दुरूस्ती करणे, ही कामे विहित वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी किल्ले रायगडावर कार्यक्रमासाठी पिण्याचा पाण्याच्या जास्तीत जास्त टाक्या उपलब्ध करणे, किल्ल्याच्या खालीदेखील आवश्यक पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, आवश्यक असून कार्यक्रम कालावधीमध्ये आवश्यक तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असे आदेश पालकमंत्री श्री.सामंत यांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांना दिले.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाड ते पाचाडपर्यंत आवश्यकतेनुसार एस.टी बस उपलब्ध असणे, नियंत्रण कक्ष तयार करणे, वाहतुकीच्या अनुषंगाने छोट्या एस.टी बसेस या बाबी आवश्यक आहे. त्यानुसार महाड राज्य परिवहन विभागाच्या आगार व्यवस्थापकांनी आवश्यक त्या व्यवस्था करण्याबाबत पालकमंत्री श्री.सामंत यांनी संबंधित आगार व्यवस्थापकांना सूचना दिल्या.

याशिवाय शिवभक्तांच्या गाडयांच्या सुव्यवस्थित पार्किंगबाबत नियोजन करणे, वाहतूक कोंडी होणार नाही यादृष्टीने नियोजन करणे, पाचाड येथे वाहतूक नियंत्रण करणे, अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या (व्हीआयपी) गाडया पार्किंगचे नियोजन करणे, कार्यक्रमांच्या अनुषंगाने बंदोबस्त व्यवस्था चोख ठेवणे, ही जबाबदारी पोलीस विभागाने अतिशय काळजीपूर्वक सांभाळावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी पोलीस विभागास दिले.

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रोप-वे व्यवस्थापकांनी सोहळयाचा विचार करून रोप-वेची क्षमता व त्यानुसार आवश्यक ते नियोजन करावे, रोप-वे सुस्थितीत ठेवावा, कार्यक्रमाकरिता आवश्यक असलेली साधन सामुग्री गडावर पोहोचविण्याच्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांकडून रोप-वे व्यवस्थापकांना देण्यात आल्या.

महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर  24 तास अखंडित वीजपुरवठ्याची व्यवस्थेबाबत आवश्यक ते नियोजन करावे, रायगड किल्ल्यावर तसेच  किल्ल्याच्या पायथ्याशी अखंडित विद्युत पुरवठा होण्यासाठी आवश्यक अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करावी, आरोग्य विभागाने राज्याभिषेक सोहळयाच्या अनुषंगाने आवश्यक ठिकाणी आरोग्य पथके नियुक्ती करावीत, या आरोग्य पथकांकडे मुबलक प्रमाणात औषधे, व इतर साहित्याची उपलब्धतता ठेवावी, आवश्यक तेवढे स्ट्रेचर सुविधा, रूग्णवाहिका उपलब्ध ठेवाव्यात, महाड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने पाचाड येथे अग्निशामक बंब उपलब्ध ठेवावेत, कार्यक्रमाच्या ठिकाणी बलून लाईटची कर्मचाऱ्यांसह व्यवस्था ठेवावी,  महाड पेट्रोलपंप असोसिएशने राज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाच्या अनुषंगाने सोहळ्याच्या दिवशी महाड शहरातील सर्व पेट्रोलपंपांवर अतिरिक्त पेट्रोल/डिझेल साठा उपलब्ध ठेवावा, राष्ट्रीय महामार्ग पेण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पोलीस विभागाच्या समन्वयातून महाड-रायगड राष्ट्रीय महामार्गाने वाहतूक सुरळीत होईल या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे, महामार्गावरील खड्डे, मोऱ्या, झाडे यामुळे अपघात होणार नाही, यादृष्टीने नियोजन करावे तसेच कार्यक्रमाच्या वेळी बंद/नादुरुस्त वाहनांचा इतर वाहनांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होवू नये, यासाठी टोईंग व्हॅनची व्यवस्था उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण यांनी करावी, अशा सूचनाही पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

 आपल्या सर्वांसाठी किल्ले रायगडावर साजरा होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा अतिशय अभिमानास्पद आहे. हा सोहळा अतिशय दिमाखदार व शिस्तबध्द पध्दतीने संपन्न होण्यासाठी प्रत्येक घटकाने आपल्याला सोपविण्यात आलेली जबाबदारी अत्यंत जबाबदारीने पार पाडावी, यासाठी शासन सर्व प्रकारची मदत करण्यास तत्पर आहे.  या सोहळ्यानिमित्त जमणाऱ्या शिवभक्तांसाठी अन्नछत्र, रोप-वे तसेच एसटी वाहतूकीची विनामूल्य सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत शासनस्तरावर निश्चित प्रयत्न केले जातील, या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्यावर कोणकोणत्या सुविधा कायमस्वरुपी उभारण्यात येवू शकतील याचे नियोजन करुन त्याप्रमाणे संबंधित प्रस्ताव/आराखडे सादर करावेत, याबाबतही पालकमंत्री श्री.सामंत उपस्थित अधिकारी वर्गाशी सविस्तर चर्चा करुन आवश्यक त्या सूचना दिल्या.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक