"गरुडझेप स्पर्धा परीक्षा केंद्र" उपक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा--विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर “एमपीएससी गट 'ब' व गट 'क' संयुक्त पूर्वपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन पहिल्याच दिवशी 350 हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला कार्यशाळेचा लाभ


 

अलिबाग,दि.27(जिमाका):- रायगड जिल्ह्यामधील महाविद्यालयीन तरुण-तरुणींना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अधिकाधिक प्रोत्साहित करण्यासाठी "गरुडझेप स्पर्धा परीक्षा केंद्र" हा उपक्रम तत्कालीन रायगड जिल्हाधिकारी तथा कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विनामूल्य राबविला जात आहे. तसेच रायगड जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम रायगड जिल्ह्यात पुढे सुरूच राहणार आहे.  हा उपक्रम माध्यमातून सर्वांना ज्ञात व्हावा आणि आपल्या परिसरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

 विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकारातून एमपीएससी गट 'ब' व गट 'क' संयुक्त पूर्वपरीक्षा 30 एप्रिल 2023 च्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे जिल्हाधिकारी कार्यालय,रायगड तसेच जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या फेसबुक पेज व यू-ट्यूबद्वारे थेट  प्रक्षेपण करण्यात येत आहे.

बुधवार,दि.26 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता मार्गदर्शन शिबिराला सुरुवात झाली. सकाळच्या प्रथम सत्रात नवनाथ वाघ यांनी चालू घडामोडी' या विषयावर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात अजित गायकवाड यांनी अर्थशास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले.

आज गुरुवारी (दि.27 एप्रिल रोजी) श्री.महेश शिंदे यांनी 'एमसीक्यू सॉल्व्हिंग टेक्निक्स' आणि 'परीक्षेच्या दिवसांचे 'नियोजन या विषयावरील मार्गदर्शन केले. तर दुपारच्या सत्रात श्रीकांत जाधव हे 'भूगोल' या विषयावर मार्गदर्शन केले.

त्याचप्रमाणे दि.28 एप्रिल 2023  रोजी विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात नंदकुमार पाटील यांचे 'इतिहास- समाजसुधारक' तर दुपारच्या सत्रात लक्ष्मण नखाते यांचे 'विज्ञान' या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे.

पहिल्या दिवशी (बुधवार,दि.26 एप्रिल 2023 रोजी) या कार्यशाळेप्रसंगी पनवेल उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, कर्जत उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, पनवेल तहसिलदार विजय तळेकर, खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी उपस्थित होते.

 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथून उत्तम मार्गदर्शकांना आमंत्रित करण्यात आले आहे. या 3 दिवसात विद्यार्थ्यांनी यापूर्वी केलेल्या अभ्यासाची उजळणी घेण्यात येणार आहे. शिबिरासाठी पनवेल, खालापूर, कर्जत, उरण व पेण या पाच तालुक्यातील विद्यार्थी आले आहेत. पहिल्याच दिवशी 350 हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला आहे.

गरुडझेप या स्पर्धा परीक्षा अभ्यास उपक्रमामध्ये आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील 6 हजार 336 विद्यार्थ्यांनी गरुडझेप या ॲपवर आपली नोंदणी केलेली आहे. शिवाय रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्याच्या ठिकाणी गरुडझेप स्पर्धा परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सुरू आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत पेण आणि अलिबाग या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या दृष्टीने सर्व सोयीसुविधांनी युक्त गरुडझेप स्पर्धा परीक्षा केंद्र, अभ्यासिका अशी स्वतंत्र इमारत देखील उभी करण्यात आली आहे.

     गरुडझेप या विनामूल्य ॲपद्वारे देखील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन केले जाते. या ॲपवर स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमाविषयी संदर्भासाठी ऑनलाईन लेक्चर्स, महत्त्वाची संदर्भ पुस्तके विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

     गरुडझेप या विनामूल्य ॲपचा तसेच या कार्यशाळेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक