प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला सामावून घ्यावे --जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे

 

 

अलिबाग,दि.27(जिमाका): जनसुरक्षा मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये सामावून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी ग्रामपंचायत प्रशासन व जिल्ह्यातील बँकर्सना केले.

      भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत स्तरावर जन सुरक्षा मोहीम राबवण्याबाबत विशेष जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली काल (दि.26 एप्रिल रोजी) जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृह येथे घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बँक ऑफ इंडिया रायगड च्या विभाग प्रमुख श्रीमती शंपा बिस्वास, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (ग्रामपंचायत) राजेंद्र भालेराव, प्रकल्प संचालक श्रीमती प्रियदर्शनी मोरे, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी, जिल्हा विकास अधिकारी नाबार्ड तर्फे प्रदीप अपसुंदे आणि विविध बँकांचे जिल्हा प्रतिनिधी,आर्थिक समावेशन विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

             दि.1 एप्रिल ते दि.30 जून 2023 दरम्यान जनसुरक्षा मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान बँकांच्या मदतीने ग्रामपंचायत स्तरावर विविध तारखांना शिबिरे घेण्यात येणार आहेत. ही शिबिरे यशस्वी होण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी प्रयत्न करावेत, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. योगेश म्हसे पुढे म्हणाले की, कुटुंबातील विमाधारक व्यक्तीचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू ओढवला तर त्यांच्या वारसांना अर्थसहाय्य मिळवून देणाऱ्या या विमा योजना आहेत. प्रधानमंत्री सुरक्षा विमा (अपघाती) योजनेचा केवळ 20 रुपये वार्षिक हप्ता असून ही योजना 18 ते 70 वयोगटातील व्यक्तींसाठी आहे. तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा (नैसर्गिक/अपघाती)योजनेचा वार्षिक हप्ता केवळ 436 रुपये असून ही योजना 18 ते 50 वयोगटातील व्यक्तींसाठी आहे. केवळ 456 रुपये इतक्या अत्यल्प वार्षिक हप्त्यामध्ये या दोन्ही विमा सुरक्षा योजनांमध्ये नागरिक सहभागी होवू शकतात.

या योजनांबाबत व्यापक जनजागृती करुन जिल्ह्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना या विमा योजनेत सहभागी करुन घ्यावे. नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी भित्तीपत्रके, माहितीपत्रिकांचे वाटप करा. समाज माध्यमांसह विविध माध्यमांद्वारे योजनेची व्यापक प्रसिद्धी करा. बचतगटातील 100 टक्के महिलांना या मोहिमेंतर्गत सामावून घेण्याबाबतही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महिला आर्थिक विकास महामंडळाला सूचना केल्या. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणारे शिबिर यशस्वी होण्यासाठी संबंधित विभागांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. योगेश म्हसे यांनी शेवटी केले.

            जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी यावेळी उपस्थित सर्व बँकांना आवाहन करताना म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक बँकेला 2011 मधील जणगणनेनुसार ग्रामपंचायती बँक शाखानिहाय विभागणी आणि मेळाव्याचे ठिकाण आणि मेळाव्याची तारीख निश्चित झाली असून संबधित बँकांना ग्रामपंचायतमध्ये मेळावे घेण्यासाठी पूर्ण  नियोजपूर्वक आराखडा पाठवला आहे. आणि तो जिल्हा परिषदेमार्फत सर्व ग्रामपंचायतींना पाठवण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील बँकेच्या प्रत्येक शाखेने मेळावे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन, सीएससी  केंद्र, बचत गट, बँक साथी,  व्यापारी बॅंका, रायगड जिल्हा बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक व संबंधित सर्व विभागांच्या सहकार्याने चोख नियोजन करण्यात येत आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक