कर्तव्य दक्ष तहसिलदार विजय तळेकर यांनी आदिवासी कुटुंबाला दिली नव संजीवनी

 

 

अलिबाग,दि.13(जिमाका):- मौजे हेदूटने ता.पनवेल येथील कानी बाळ्या पोकला या आदिवासी कुटूंबांच्या सर्व्हे नंबर 123/1/ब 32 गुंठे जमीन मिळकतीवर एका परप्रांतीय व्यक्तीने अवैध पद्धतीने कब्जा केला होता. त्या संदर्भात तहसिलदार पनवेल श्री.विजय तळेकर यांच्या कोर्टात दाद मागितली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आवश्यक त्या चौकशी आणि सुनवण्या घेवून, फक्त तीन महिन्यात ती जमीन आदिवासी कुटुंबाला परत मिळवून दिली आणि तसे आदेश निर्गमित केले. जी जमीन मालकीची असून ही त्यातून 1 रुपयाचे उत्पन्न न मिळणाऱ्या पोकला कुटुंबीयांना दरमहा 45 हजार रुपये भाडे मिळणार आहे.

या पैश्यामुळे आदिवासी कुटुंबाची आर्थिक अडचण कायम स्वरुपी मिटणार आहे. तसेच त्या जमिनी संदर्भातील इतर विषय देखील मार्गी लागणार आहेत. हे सर्व प्रकरण आणि झालेल्या अन्याया विषयी अनंता बाळ्या पोकला याने त्यांचे चिरनेर आश्रम शाळेचे शिक्षक श्री.डोईफोडे यांना सांगितले. डोईफोडे यांनी त्यांना मार्गदर्शन केले की, तुम्ही उरण सामाजिक संस्थेची मदत घ्या आणि त्याकरिता प्रा.राजेंद्र मढवी यांना भेटा. उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री.सुधाकर पाटील, सर चिटणीस संतोष पवार, नामदेव ठाकूर, दत्ता गोंधळी, सुनिल जोशी, मनीष कातकरी यांनी या प्रकरणात मार्गदर्शन केले आणि प्रत्येक वेळेस कोर्टात बाजू देखील मांडली. प्रा.राजेंद्र मढवी यांनी सदरहू मिळणारे भाडे हे मुलांच्या शिक्षणासाठी वापरावे आणि कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये अशी सूचना त्या आदिवासी कुटुंबास केली आहे. तहसिलदार पनवेल श्री.विजय तळेकर यांनी हे प्रकरण अतिशय संवेदनशील पणे हताळल्यामुळेच हे शक्य झाल्याचे प्रा.राजेंद्र मढवी यांनी सांगितले.

आदिवासी समाजातील लोकांसाठी हे एक चांगले उदाहरण असून जर एखाद्या आदिवासी व्यक्तीची जमीन शासनाची परवानगी न घेता भाडे तत्वावर किंवा खरेदी खत करून हडपली किंवा कब्जा केला असेल तर सदरहू जमीन त्या आदिवासी खातेदारांना परत मिळू शकते आणि त्या जागेचे दरमहा भाडे सुद्धा मिळू शकते. पोकला या आदिवासी कुटुंबियांनी सर्व आदिवासी समाजातील लोकांना आवाहन केले आहे की, अशा कोणत्याही प्रकारे अन्याय झालेल्या आदिवासी लोकांनी पुढे येवून उरण सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांना भेटावे तसेच आमच्या प्रकरणात एकही रुपया न घेता उलट सर्व खर्च उरण सामाजिक संस्थेने केला. उरण सामाजिक संस्था ही एक प्रामाणिक संस्था असून ते नक्कीच न्याय मिळवून देतील.  परंतु आदिवासी लोकांनी शेवट पर्यंत ठाम राहिले पाहिजे. या प्रकरणात पनवेल ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.कोरडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार उमेश परिडा, पत्रकार विठ्ठल ममताबादे आणि इतर सर्व पत्रकारांनी आदिवासी कुटुंबाची बाजू चांगल्या प्रकारे मांडली. पनवेलचे तहसिलदार श्री.विजय तळेकर यांच्या सारखे कर्तव्य दक्ष अधिकारी सर्व तालुक्यांना मिळाले तर गोर गरीब जनतेला नक्कीच न्याय मिळेल आणि न्याय व्यवस्थेवर चा विश्वास दृढ होईल.

मौजे हेदूटने तालुका पनवेल येथील कानी बाळ्या पोकला या कुटुंबाला त्यांची 32 गुंठे जागा परत मिळवून दिली. आज त्या आदिवासी कुटुंबाला सदरहू 32 गुंठे जमिनीसाठी 45,000/- रुपये दरमहा भाडे चालू झाले आहे.आदिवासी कुटुंबाने तहसिलदार श्री.विजय तळेकर यांचे आभार मानले, सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक