“ब्लॅक स्पॉट” वरील अपघात कमी करण्याकरिता तात्काळ व दीर्घकालीन उपाय करावेत-- खासदार श्रीरंग बारणे

 

 

अलिबाग,दि.26(जिमाका):- रायगड जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात 22 अपघात प्रवण क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. या निश्चित करण्यात आलेल्या ब्लॅक स्पॉटस् ची संबंधित विभागांनी तातडीने पाहणी करून ब्लॅक स्पॉटस् वरील अपघात कमी करण्याकरिता तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश खासदार श्रीरंग बारणे यांनी संबंधित विभागांच्या उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हा नियोजन भवन येथे संसदीय रस्ते सुरक्षा समिती आढावा बैठक (दि.25 एप्रिल 2023) रोजी खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार सुनिल तटकरे  यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी आमदार महेंद्र दळवी, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महामार्ग वाहतूक सुरक्षा पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, नवी मुंबई वाहतूक उपायुक्त तिरुपती काकडे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सत्यजित बडे, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, पनवेल उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, पेण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, उप प्रादेशिक परिवहन, राष्ट्रीय महामार्ग व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अख्यत्यारित असलेल्या 18 ब्लॅक स्पॉटस्, राज्य महामार्ग यांच्या अख्यत्यारित असलेल्या रस्त्यावरील 2 ब्लॅक स्पॉटस् व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अख्यत्यारित असलेले 2 ब्लॅक स्पॉटस् ची परिवहन विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत तातडीने संयुक्त पाहणी करुन  ब्लॅक स्पॉटवरील अपघात कमी करण्याकरिता तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. तसेच राष्टीय महामार्ग क्रमांक 48 वर आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक चिन्हांचे बोर्ड, मार्गदर्शक चिन्हांचे बोर्ड, वेगमर्यादेचे बोर्ड, रमलर स्ट्रिप्स, कॅट आईस व ब्लिंकर्स बसविण्यात यावेत. कशेडी घाटामध्ये आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक बोर्ड, मार्गदर्शक बोर्ड, वेगमर्यादेचे बोर्ड बसविण्यात यावेत.

अपघातांची नोंद IRD प्रणालीवर करण्यात येत असून अपघात झालेल्या वाहनाची माहिती संबंधित पोलीस स्टेशन मार्फत IRD प्रणालीवर करण्यात येते व त्यानंतर या कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांच्यामार्फत संबंधित अपघाताची तपासणी होऊन त्याचा अहवाल IRD प्रणालीवरच अपलोड करण्याची संबंधित विभागाने कार्यवाही करावी, असे सांगून ते पुढे म्हणाले की, पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग व पुणे-मुंबई जुना महामार्ग तसेच अन्य महामार्गांवरील रस्ते अपघात कमी करण्यासाठी 24 तास वायूवेग पथक कार्यरत ठेवावे. या पथकामार्फत विना हेल्मेट, विना सिटबेल्ट, लेन कटिंग, ओव्हरस्पीडींग, प्रखर दिवे, मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणे, कर्णकर्कश हॉर्न, रिफ्लेक्टर्स, ब्रेक लाईटस् व्यवस्थित नसणे, अशा अनेक चुकीच्या बाबींसाठी वाहनचालकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. महामार्गावरील पेट्रोल पंप, हॉटेल्स यांनी रस्त्यावर अवैधरित्या रस्ता दुभाजक बनविलेले असून त्यामुळेही अपघात होण्याची शक्यता असते, यासाठी महामार्गावरील रस्ता दुभाजक बंद करण्याची आवश्यक कार्यवाही संबंधित विभागाने करावी. तसेच रायगड जिल्ह्यातील दक्षिण विभागातील वाहन मालकांच्या सोयीकरिता माणगाव येथे फिटनेस ट्रॅक उभारण्याबाबत आवश्यक ते नियोजन करावे, असेही त्यांनी शेवटी निर्देश दिले.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक