गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ वारसदारांना मिळणार तालुका स्तरावरच

 

 

अलिबाग,दि.8(जिमाका) :- शेती करताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात व मानवनिर्मित तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना कायमचे अपंगत्व येते. घरातील व्यक्तीच्या झालेल्या अपघातामुळे कुटंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकरी अथवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही योजना 2005-06 पासून राबविण्यात येत आहे. पूर्वी विमा कंपनी तसेच विमा सल्लागार कंपनी यांचा असमाधानकारक कामाचा अनुभव, अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला अत्यंत उशिराने मिळणारी मदत व जुजबी त्रुटी काढून वारंवार प्रस्ताव नाकारण्याची विमा कंपनी यांची भूमिका यामुळे शासनाने योजनेत बदल करून दि.19 एप्रिल 2023 पासून अपघाती मृत्यू/अपंगत्व यासाठी नवीन "गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना" राबविण्यास मान्यता दिली आहे. या नवीन योजनेत मागील योजनेतील त्रुटी काढून शेतकऱ्यांसाठी अनुकूल अशी कार्यपद्धती अवलंबली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने प्रस्ताव मंजूरीचे अधिकार तालुकास्तरावरील तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीला देण्यात आलेले आहेत. अपघात घडल्यानंतर तीस दिवसांच्या आत परिपूर्ण प्रस्ताव वारसदारांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावयाचा आहे. त्यानंतर त्याची तपासणी करून त्वरीत मदत वाटप डीबीटीने करण्याची कार्यवाही तालुका कृषी अधिकारी यांनी करावयाची आहे.

             अपघाताचे स्वरूपः- शेती व्यवसाय करताना होणाऱ्या अपघात, रस्ता रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू कीडनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश- विंचू दंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे/चावण्यामुळे जखमी/मृत्यू, दंगल अन्य कोणतेही अपघात तसेच अपघाताच्या व्याख्येनुसार कोणतेही अनपेक्षित आकस्मिक दुर्दैवी अपघातामुळे होणारे मृत्यू अथवा अपंगत्व या बाबींचा समावेश या योजनेत होता. या यादीमध्ये आता बाळंपणातील मृत्यूचा देखील समावेश करण्यात आला आहे.

              कुटुंब व्याख्या व अनुदानः- महाराष्ट्र राज्यातील अपघाताच्या दिवशी स्वतः वहितीधारक खातेदार असलेले शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य (यामध्ये आई-वडील, शेतकऱ्याचा पती-पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकूण दोन जणांना समावेश असेल.अपघाती मृत्यू तसेच अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव अथवा एक डोळा व एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास २ लाख रूपये तर अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास 1 लाख रूपये लाभ अनुज्ञेय आहे.

             कागदपत्रेः- योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास अपघात घडल्यानंतर 30 दिवसांच्या आत सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, फेरफार उतारा (6 ड),  वारसनोंद उतारा (6क), शेतकऱ्याच्या वयाचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र), प्रथम माहिती अहवाल (FIR)/स्थळ पंचनामा/पोलीस पाटील माहिती अहवाल, मरणोत्तर अहवाल, शवविच्छेदन अहवाल (PM), वाहन परवाना, पाण्यात बुडून बेपत्ता झाल्यास प्रथम माहिती अहवाल व शेतपूर्ती बंधपत्र आवश्यक, बाळंतपणात मृत्यू झाला असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र (शासकीय आरोग्य केंद्र),  अपंगत्व असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र, ही कागदपत्रे घेवून संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीम.उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक