उन्हात फिरणे टाळा..उष्माघातापासून सांभाळा…! --जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे

 

 

अलिबाग,दि.15(जिमाका):- रायगड जिल्हा उष्माघातप्रवण आहे. त्यानुषंगाने दि.1 मार्च ते दि.15 जून 2023 या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सर्व कार्यकारी यंत्रणामध्ये समन्वय राहण्यासाठी उन्हाळी हंगामातील उष्मलाटेमुळे उद्भवणाऱ्या उष्माघातानी मानव, पशु-प्राणी व शेती पिकांवर होणारे दुष्परिणाम टाळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर विविध विभागांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड डॉ.योगेश म्हसे यांनी सर्व शासकीय विभागांना आदेशित केले आहे. तसेच नागरिकांना उन्हात फिरणे टाळा..उष्माघातापासून सांभाळा…! असे आवाहनही केले आहे.

          वातावरणातील बदलामुळे विशेषतः उन्हाळी हंगामात वाढत्या तापमानामुळे रायगड जिल्हा उष्मालाट प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी संयुक्तरित्या आयोजित दोन दिवशीय कार्यशाळेत उष्माघात उपाययोजनासाठी स्थानिक स्तरावर करावयाच्या नियोजनाविषयी सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, रेल्वे प्रशासन, शिक्षण विभाग, रस्ते परिवहन विभाग, रोजगार हमी, पशुसंवर्धन, वन विभाग, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा नियोजन अधिकारी, कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम या विभागांनी उष्माघाताचे परिणाम कमी करण्यासाठी अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचे आराखडे तयार करण्याबाबत सूचविले आहे. उष्णतेची लाट अथवा उष्माघाताचा विचार करताना तापमाना व्यतिरिक्त हवेतील आर्द्रता, धुळीचे कण, हवेचे प्रदूषण या बाबीसुध्दा विचारात घेवून जिल्ह्यातील भौगोलिक व वातावरणीय बाबींचा विचार करून याबाबतचे नियोजन करणे आवश्यक आहे. तापमानाच्या निकषांनुसार सलग दोन दिवस डोंगरी भागात 30 डिग्री सेल्सियस समुद्री किनारपट्टयात 37 डिग्री सेल्सियस व समतल भूभागात 40 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमानाची नोंद होणे किंवा या विभागात सलग दोन दिवस हंगामातील सामान्य तापमानापेक्षा 4.5 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमानाची वाढ होणे, यापैकी कोणतीही एक नोंद आढळल्यास या भागामध्ये उष्णतेची लाट आहे, असे समजून त्यामुळे होणाऱ्या परिणामाला सामोरे जाण्यासाठी दक्ष राहणे अत्यावश्यक आहे.    

            वातावरणातील तापमानासोबत हवेतील आर्द्रता जास्त असल्यास त्या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचे अधिक दुष्परिणाम जाणवतात, हे सुध्दा अभ्यासांती सिध्द झाले आहे. याशिवाय काही भागात रात्रीच्या वेळी तापमान कमी न होता अधिक उष्ण राहत असल्याने हा भाग अतिसंवेदनशील व उष्माघातप्रवण बनतो. अशा परिस्थितीत मानवी शरीरावर विशेषत: झोपडपट्टी मध्ये राहणारे, रस्त्याशेजारील अथवा फिरते विक्रेते, बसस्थानक, रेल्वे स्थानक, यात्रेचे ठिकाण, विविध धार्मिक स्थळे, विवाह सोहळे, बाजार समितीत काम करणारे, नियमित बाजार अथवा आठवडा बाजारातील विक्रेते येथे भेट देणारे वयोवृद्ध लहान लेकरे, महिला यांच्यावर उष्णतेचे जास्त परिणाम दिसून येतो. 

              रायगड जिल्हा उष्माघात प्रवण असल्याने व आपत्ती या सदरात येत असल्याने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड डॉ.योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील उष्माघात प्रवण क्षेत्र असल्याने विविध विभागांना जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आदेश जारी केले आहेत.

            संबंधित अधिकाऱ्यांनी मध्यम व दीर्घ स्वरूपाचे नियोजन व अंमलबजावणी करावी. ग्रामीण व शहरी भागातील अंतर्गत सिमेंट रस्त्यांना पर्यायी विचार करणे, जेणेकरून तापमानात वाढ होणार नाही, नाली व गटारे सुस्थितीत ठेवण्यासाठी उपाययोजना करणे, प्रत्येक घराच्या छतावर पांढऱ्या रंगाचे आवरण करणे अथवा पांढरे आच्छादन करावे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या छतावर असल्यास त्या काळया रंगाऐवजी पांढऱ्या रंगाच्या असाव्यात, शहरातील बाग-बगिच्यांमध्ये तसेच सार्वजनिक जागेमध्ये अथवा मोकळया जागेमध्ये अधिकाधिक झाडांची लागवड करणे, पर्यावरणास अनुकूल व स्थानिक प्रजातीच्या झाडांची लागवड करणे, शहरातील विहिरी सुस्थितीत ठेवणे, उष्ण लाट अनुरुप (HEAT TRESS) बिल्डिंग प्लॅन बंधनकारक करणे, घरे बांधणारे कारागीर बिल्डर यांना तांत्रिक उष्मा लाट अनुरूप इमारती विषयक प्रशिक्षण देणे, झोपडपट्टी विकास प्रकल्प अंतर्गत व शासनाच्या विविध योजनेतून परवडणारी घरे बांधताना वरील बाबींचा विचार करणे,  जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्था, नेचर क्लब, युथ क्लब, रोटरी क्लब, लायन्स क्लब इत्यादींना या कार्यक्रमात सामावून घेणे,  शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये उष्ण लाट विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आराखडा तयार करणे,  नागरी व ग्रामीण भागातील खुल्या मोकळ्या जमिनीवर वृक्षारोपण करून पर्यावरण समतोल साधण्याचा प्रयत्न करणे, बाजार समित्या, बस स्थानक, रेल्वे स्थानक, इत्यादी सार्वजनिक ठिकाणी अधिकाधिक सावली निर्माण होईल, यासाठी उपाययोजना करणे, रस्त्यावर फिरते विक्रेते यांच्यासाठी शक्यतो सावलीची ठिकाणे निश्चित करणे, उन्हाळयात निर्माण होणारी विजेची टंचाई लक्षात घेता दीर्घकालीन उपाययोजना म्हणून सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये सोलर एनर्जीवर चालतील यासाठी उपाययोजना करणे तसेच खाजगी आस्थापना व घरे यांना सोलर एनर्जी च्या वापराविषयी चालना देणारे उपक्रम हाती घेणे, रुफ वॉटर हार्वेस्टिंग, कूपनलिका पुनर्भरण, विहीर पुनर्भरण करणे, तलावातील गाळ काढणे इत्यादी कामे नागरी सहभागातून करणे इत्यादी जलसंधारणाची कामे नागरी सहभागातून करणे, शहरामध्ये दररोज ये-जा करणारी लोकसंख्या विचारात घेवून त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे,जेणेकरून त्या ठिकाणी सावलीयुक्त निवारा उपलब्ध होईल, खुल्या जागेवरील अतिक्रमणास प्रतिबंध करणे.

        शासकीय व निमशासकीय यंत्रणेकडून करावयाची कार्यवाही :- उष्णलाट (Heat Wave) व्यवस्थापन कालावधी हा सर्वसाधारणपणे दरवर्षी 1 मार्च ते 15 जून असा राहील, नागरिकांच्या मदतीकरिता तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये हे संपर्क क्रमांक प्रसारित करण्यात यावेत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक बोलविण्यात यावी, या बैठकीत लघु कृती आराखडा संबंधित विभागाकडून तयार करून घ्यावा, झोपडपट्टी गर्दीची ठिकाणे, कारखाने, व्यवसाय, वीट भट्टी व तत्सम व्यवसायामध्ये काम करणारे कामगार, ग्रामीण भागातील यात्रेची ठिकाणे, धार्मिक स्थळे इत्यादींचा विचार करून त्या ठिकाणी आवश्यक वैद्यकीय सुविधा सर्व आरोग्य केंद्रावर आहे किंवा नाही याची खात्री करावी, आरोग्यविषयक बाबीसाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक संपर्क अधिकारी (नोडल अधिकारी) म्हणून काम करतील व ते जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून आरोग्य सेवेविषयी प्रत्येक उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, कुटीर रुग्णालय, जिल्हा रुग्णालयातील सर्व आरोग्याविषयी सोई-सुविधा पूर्ण वेळ उपलब्ध राहतील, याची खात्री करतील. भारतीय हवामान (IMD) उष्णतेच्या लाटेसंदर्भात पूर्वसूचना (Early Waming) अंदाज वर्तविण्यात येतात, यासंबंधीची अद्ययावत माहिती प्राप्त करण्यासाठी व संकलित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या हवामान खात्याशी संबंधित जिल्हा प्रादेशिक अधिकारी अथवा जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी दररोज भारतीय हवामान विभागाकडून माहिती घेवून जिल्हाधिकाऱ्यांना  देतील. हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेची पूर्वसूचना येताच स्थानिक दूरचित्रवाणी वाहिन्या, रेडिओ, सोशल मिडीया,  ध्वनीक्षेपक इत्यादीच्या माध्यमातून नागरिकांना सूचना व इशारा देणे.

उष्माघाताची लक्षणे :- चक्कर येणे, उलटी व मळमळ होणे, शरीराचे तापमान खूप वाढणे, पोटात कळा येणे, शरीरातील पाणी कमी होणे.

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे :- तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे, हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करण्यात यावा, प्रवास करताना पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत प्यावी, उन्हात काम करीत असलेल्या कामगारांनी व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा पांढरा रुमाल बांधावा किंवा छत्रीचा वापर करावा, तसेच ओल्या कपडयांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा,  शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस.घ्यावे, घरी तयार करण्यात आलेली लस्सी, ताक, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी इत्यांदीचा नियमित वापर करण्यात यावा, अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा, रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात, पंखे ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे, कामाच्या ठिकाणी कामगारांसाठी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे, पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा, बाहेर उन्हात काम करीत असताना थोड्या अंतराने विश्रांती घ्यावी, रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत,  जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी, क्राँक्रिट घरांच्या छतावर पांढरा रंग द्यावा, टीन पत्र्याच्या छतांवर गवताची पेंढी, धान्याचा कडवा यांचे आच्छादन करावे, छतावरील पाणी साठवण्याच्या प्लॅस्टिक टाक्या गोणपाटाच्या साहाय्याने झाकाव्यात.

काय करावे व काय करु नये:- लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, दुपारी 12  ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी 12  ते 3.30 या कालावधीत बाहेर कामे करणे टाळावे, उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी, उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नये, मद्य सेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक घेवू नये, त्यामुळे डिहायड्रेशन होते, शक्यतो उन्हात वाहने चालवू नये, उष्माघाताचे लक्षण दिसताच तात्काळ डॉक्टरांना संपर्क साधावा, ज्वलनशील पदार्थापासून शक्यतो दूर राहावे.

       जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडून उष्माघाताबाबत वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे यांनी केले आहे.


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक