लोकाभिमुख प्रशासनाची जय्यत तयारी.. शासन आपल्या दारी..!


 

अलिबाग,दि.15(जिमाका) :- कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते.  शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना राबवत असते. गरजूंसाठी तो आधार तर असतोच त्याचप्रमाणे, सामूहिक विकासप्रक्रियेलाही त्यातून गती मिळत असते. हे लक्षात घेऊन नागरिकांना विविध योजनांचे थेट लाभ मिळावेत  यासाठी शासनाने एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे.. या उपक्रमांतर्गत शासन शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी  थेट जनतेपर्यंत घरोघरी  जाणार आहे. या उपक्रमाचे नाव आहे शासन आपल्या दारी..!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून लोकाभिमुखतेची ग्वाही दिली आहे. या उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सातारा येथे नुकताच शुभारंभ झाला. हा उपक्रम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.  त्यामुळे नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ आणि विविध महत्त्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार आहेत. राज्यातील लाखो गरजू व्यक्तींना या माध्यमातून लाभ मिळणार आहे.

जनकल्याण कक्षाद्वारे संनियंत्रण

राज्यभर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षामार्फत राज्यातील अभियानाचे समन्वयन करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी या अभियानाचे प्रमुख आहेत.  त्यांच्या माध्यमातून जिल्हा आणि तालुकास्तरावर देखील जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यात याबाबत जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी प्रत्यक्ष बैठक घेऊन सर्व शासकीय विभागांना आवश्यक त्या सूचना देवून कार्यवाही सुरु केली आहे.

प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजारांचे उद्दिष्ट

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान 75 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा, तालुका स्तरावर 2 दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या संकल्पनेतून या अभियानाला चालना देण्यात आली आहे.

पारदर्शक आणि वेगवान कार्यवाही

शासनाच्या योजनांचा, उपक्रमांचा थेट लाभ सर्वसामान्यांना त्वरित मिळावा, हा या अभियानाचा उद्देश आहे. शासनाच्या जवळजवळ दोनशेहून अधिक योजनांचा लाभ या माध्यमातून गरजूंना मिळवून दिला जाणार आहे. त्यासाठी कमीतकमी कागदपत्रे सादर करुन जलद मंजुरी मिळण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. गरजूंना विविध योजनांचा लाभ सुलभरित्या व गतीने मिळवून देणारा हा उपक्रम सर्वसामान्यांसाठी आशादायक ठरणार आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक