गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेस नव्याने सुरुवात अल्प व अत्यल्पभूधारक, विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना घेता येणार या योजनेचा लाभ

 

 

अलिबाग,दि.8(जिमाका) :- राज्यामध्ये ०६ मे २०१७ पासून मार्च २०२१ अखेर पर्यंत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. महाराष्ट्र शासन, मृद व जलसंधारण विभागाच्या दि २० एप्रिल २०२३ अन्वये ही योजना पुन्हा सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत काम करणाऱ्या अशासकीय संस्था यांना यंत्रसामग्री आणि इंधन या दोन्हीचा खर्च देणे प्रस्तावित आहे. तसेच अल्प व अत्यल्पभूधारक, विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त  शेतकऱ्यांना या योजनेचा पुरेपूर लाभ घेता येईल याकरिता अनुदान देणे प्रस्तावित आहे. अशासकीय संस्थांना गाळ काढण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री आणि इंधन याकरिता रु.३१/- प्रति घनमीटर व पात्र शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी रु.३५.७५ प्रति घनमीटर प्रमाणे एकरी रु.१५ हजारच्या मर्यादेत व २.५ एकर (रु. ३७,५००/-) पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

अभियानामध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अशासकीय संस्था यांनी तालुकानिहाय संबंधित उपअभियांता यांच्याशी संपर्क करून मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या जलसाठ्यांची माहिती घेऊन, संबंधित ग्रामपंचायतीचे ठराव सोबत सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समिती. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, रायगड प्लॉट नं. २१५, पहिला मजला विद्यानगर प.मु.पो. चेंढरे,अलिबाग-४०२२०१ ( CONTACT: dwcoraigad@gmail.com) येथे प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावात जलसाठ्यामध्ये अंदाजे उपलब्ध गाळाचा प्रमाणाचा उल्लेख असणे बंधनकारक असेल.

मृद व जलसंधारण उपविभाग माणगाव मध्ये समाविष्ट तालुके महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन (swesdmangaon@gmail.com), कोलाड उपविभागात समाविष्ट तालुके रोहा, माणगाव, तळा, सुधागड (sdessikolad@gmail.com), कर्जत उपविभागात समाविष्ट तालुके कर्जत, खालापूर, पनवेल, उरण  (sdnkarjat@gmail.com) तर अलिबाग उपविभागात समाविष्ट तालुके पेण, अलिबाग, मुरुङ (sdoswedalibag@gmail.com) .         जिल्हास्तरीय समितीमार्फत सदर प्रस्तावावर वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सूचनांच्या अनुषंगाने संबंधित संस्थांची पात्रता व क्षमता तपासून एका जलसाठा करिता एक संस्थेस कार्यकारी यंत्रणा व नमूद केलेल्या गाळाचे प्रमाण उपसण्यास प्रशाकीय मान्यता देण्यात येईल. तद्नंतर पुढील कार्यवाही उपअभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल. या योजनेमध्ये धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून धरणाची मूळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होणार आहे. तसेच उपसा केलेला गाळ शेतात पसरविल्यास शेताची उत्पादन क्षमता वाढवून कृषी उत्पन्नात वाढ होणार आहे.

तरी इच्छुक अशासकीय संस्थेच्या प्रतिनिधींनी विहीत प्रस्तावासह दि.१० मे २०२३ रोजी सायंकाळी ४.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, रायगड यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक