शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयात मिळणार पिक विमा ई-पीक ॲपव्दारे पिकांच्या नोंदी 7/12 वर करण्याचे आवाहन

 

 

अलिबाग,दि.29 (जिमाका):- जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना Cup & Cap Model (80:110) नुसार खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात चोलामंडलम एम.एस.जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपव्दारे आपल्या पिकांची नोंदी 7/12 उताऱ्यावर करुन घ्यावी, असे आवाहन  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीम.उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे.

    योजनेची उद्दिष्टे :- नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.

   योजनेची वैशिष्टे :- कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी 2 टक्के. रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवला आहे. रायगड जिल्ह्यात ही योजना चोलामंडलम एम.एस. जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत राबविण्यात येणार आहे.

   अधिसूचित करावयाची पिके :- भात व नागली

   जोखमीच्या बाबी :- हवामान घटकातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकाच्या हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांवर होणारे नुकसान, (Mid Season Adversity) पिक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भू:स्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादनात होणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे होणारे नुकसान, (Localized Calamities) नैसर्गिक कारणांमुळे पिकाचे होणारे काढणीपश्चात नुकसान, (Post Harvest Losses) या बाबींचा समावेश आहे.

      या योजनेंतर्गत शेतकरी हिश्याचा भार सुध्दा शेतकऱ्यांवर न ठेवता शेतकऱ्यांच्या हिश्याचा विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येईल. त्यामुळे सन 2023-24 पासून शेतकऱ्यांना केवळ 1/- रू भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल. प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत निश्चित करण्यात आलेली शेतकरी हिश्याची पिकनिहाय प्रति हेक्टरी विमा हप्ता रक्कम व शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता रक्कम रू. 1/- वजा जाता उर्वरीत फरकाची रक्कम राज्य हिस्सा अनुदान म्हणून राज्य शासनामार्फत अदा करण्यात येईल.

     तरी विमा हप्ता भरण्यासाठी चोलामंडलम एम.एस.जनरल इन्शुरन्स कंपनीचे तालुका कार्यालय, सर्व राष्ट्रीयकृत व सहकारी बँका, सी.एस.सी सेंटर किंवा पिक विमा पोर्टल (https://pmfbygovin) येथे सुविधा उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीकरिता आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. या योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत दि.31 जुलै 2023 अशी आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीम.उज्ज्वला बाणखेले यांनी कळविले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक