“शासन आपल्या दारी..!” “नमो शेतकरी महासन्मान निधी” योजना

 



 

कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना राबवित असते. गरजूंसाठी तो आधार तर असतोच त्याचप्रमाणे, सामूहिक विकास प्रक्रियेलाही त्यातून गती मिळत असते. हे लक्षात घेऊन नागरिकांना विविध योजनांचे थेट लाभ मिळावेत, यासाठी शासनाने शासन आपल्या दारी..! हा एक महत्वाकांक्षी विशेष उपक्रम हाती घेतला आहे.

              या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांची जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसिध्दी करण्यात येत असून काय आहेत शासकीय योजना.. जाणून घेवू या या लेखातून...

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी (PM- KISAN) योजना सुरु केली असून ही योजना केंद्र शासनाने विहित केलेल्या निकषांनुसार आणि यासंदर्भात वेळोवेळी केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशाप्रमाणे शासन निर्णयान्वये राज्यात राबविण्यात येत आहे.  ही योजना राबविण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे.

  वित्त मंत्री महोदयांच्या सन-2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्याबाबतची घोषणा केली आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राज्यात राबविण्याबाबतचा प्रस्तावास दि.30 मे 2023 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना सन 2023-24  पासून पुढीलप्रमाणे राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 या योजनेकरिता लाभार्थी पात्रता व देय लाभासाठीचे निकष :-

·         या योजनेकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहित धरण्यात याव्यात,

·         प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पी.एम.किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील,

·         तसेच केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ परिणामाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना देखील लागू होतील,

·         या बदलांकरीता महाराष्ट्र शासनाकडून वेगळा शासन निर्णय निर्गमित करण्याची आवश्यकता राहणार नाही.

·         पी.एम.किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहतील.

 

 

योजनेची कार्यपद्धती :- पी.एम.किसान योजनेच्या पीएफएमएस प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभास पात्र ठरलेले लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील. या लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणाऱ्या पोर्टलवरुन, प्रणालीवरुन बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे निधी जमा केला जाईल.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पोर्टल, प्रणाली :- पी. एम. किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थीनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत राज्याच्या निधीमधून लाभ देण्यात येणार असल्याने राज्यासाठी कृषी विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी संयुक्तपणे योजनेसाठी पोर्टल प्रणाली विकसित करण्याची कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

केंद्र शासनाच्या संमतीने पी.एम.किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांच्या पोर्टल/प्रणालीचे एकत्रिकरण (Integration) करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून अनुदान मिळण्यास पात्र लाभार्थीच्या संख्येत होणारा बदल दोन्ही पोर्टलला एकाच वेळी प्रत्यक्षात येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

 निधी वितरणाची कार्यपध्दती :- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या PM- KISAN योजनेनुसार पुढील वेळापत्रकाप्रमाणे लाभ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरणाद्वारे आयुक्त (कृषी) यांच्या मार्फत वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पहिला हप्ता- कालावधी माहे एप्रिल ते जुलै, रक्कम रु.2 हजार,

दुसरा हप्ता- माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर, रु.2 हजार,

तिसरा हप्ता- माहे डिसेंबर ते मार्च रु.2 हजार,

योजनेंतर्गत अपात्र लाभार्थ्यास लाभ प्रदान झाल्यास करावयाची वसुली :- या योजनेंतर्गत अपात्र लाभार्थ्यास लाभ प्रदान करण्यात आल्यास हा लाभधारकाकडून करावयाची वसुली महसूल यंत्रणेमार्फत करण्यात येवून आयुक्त (कृषी) यांच्या मार्फत शासनाकडे जमा करण्यात येईल.

प्रकल्प संनियंत्रण कक्ष :- राज्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रकल्प संनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकल्प संनियंत्रण कक्षाकडे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अंमलबजावणी व सनियंत्रण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असून या योजनेतील मनुष्यबळाचे संनियंत्रण व इतर आवश्यक कामकाज राज्याच्या प्रकल्प संनियंत्रण कक्षामार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अंमलबजावणी करण्यासाठी संनियंत्रण समित्या :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ग्रामस्तर, तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या संनियंत्रण समित्यांमार्फत या योजनेचे संनियंत्रण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नोडल अधिकारी यांची नियुक्ती :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेंतर्गत ग्रामस्तर, तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेले अधिकारी यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी  या योजनेसाठीदेखील नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहाण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त (कृषी) यांच्यावर सोपविण्यात आली असून त्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रत्येक 3 महिन्यास आढावा घेऊन त्याबाबतचा प्रगती अहवाल शासनास सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी

रायगड-अलिबाग

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक