शिष्यवृत्ती, फ्रिशीप योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज सादर करावेत
अलिबाग, दि.7(जिमाका):-सन 2018-19 पासून महाडीबीटी प्रणालीमार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या विविध अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे विहीत मुदतीत अर्ज भरता न येणे, अर्ज ॲटो रिजेक्ट होणे, एखाद्या वर्षी अर्ज भरता न आल्यास त्यावर्षी गॅप ईयर असे पोर्टलवर नमूद होऊन पुढच्या वर्षीचा अर्ज भरण्यास अडचण येणे अशा बऱ्याच अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.
त्यामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या दि.24 मे 2023 च्या शासन निर्णयानुसार सन-2018-19 ते सन 2021-22 या कालावधीतील शिष्यवृत्ती, फ्रिशीप योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज आपल्या संबंधित महाविद्यालयास दि.15 जून 2023 पर्यंत जमा करावयाचे आहेत.
तरी विद्यार्थ्यांनी वेळेत ऑफलाईन अर्ज महाविद्यालयात जमा करावयाचे असून ते अर्ज महाविद्यालयाने दि.20 जून 2023 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावयाचे आहेत, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव यांनी कळविले आहे.
०००००००००
Comments
Post a Comment