जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी “महास्वयम” वेब पोर्टलवर इच्छुक पात्र उमेदवारांनी नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा --सहायक आयुक्त श्रीमती अमिता पवार

 

 

अलिबाग,दि.29 (जिमाका):-जागतिक कौशल्य स्पर्धा ही WSI सदस्य देशांपैकी एका देशामध्ये आयोजित केली जाणारी सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलिम्पिक स्पर्धेच्या तोडीची आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2024 मध्ये फ्रान्स ( ल्योन ) येथे होणार आहे.  याकरिता कुशल उमेदवारांची निवड करण्याच्या दृष्टीने जिल्हा, विभाग, राज्य आणि देशस्तरावर निवड स्पर्धा घेतली जाणार असून याद्वारे विद्यार्थ्यांच्या कौशल्य आणि ज्ञानाची चाचणी घेतली जाणार आहे. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक जिंकण्याचीही संधी आहे. ही जागतिक कौशल्य स्पर्धा  दर दोन वर्षांनी होत असून जगभरातील 23 वर्षाखालील तरुण यामध्ये सहभागी होऊ शकतात. 52 विविध कौशल्य क्षेत्रांमध्ये होणाऱ्या या जागतिक स्पर्धेत भारताकडून सहभागी होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींना महास्वयम वेब पोर्टल वरून आपला सहभाग नोंदविता येणार आहे.

      या जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म दि.1 जानेवारी, 2002 किंवा तद्नंतरचा असावा. तसेच, आडेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, क्लाऊड कंप्युटींग, सायबर सिक्युरिटी, डिजिटल कन्स्ट्रकशन, इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0, इन्फॉरमेशन नेटवर्क केबलिंग, मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोट इंटिग्रेशन वॉटर टेक्नॉलॉजी या क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 1999 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.

   फ्रान्स ( ल्योन ) येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 साठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरून प्रतिभा संपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरिता सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एम.एस.एम.इ टुल रूम्स, आय.आय.टी, सिपेट, तंत्रनिकेतन महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, आयएएचएम  हॉस्पिटटेलिटी इन्स्टिट्यूट, कॉर्पोरेट टेक्निकल इन्स्टिट्यूट, स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, खाजगी कौशल्य विद्यापीठ, इन्स्टिट्यूट ऑफ ज्वेलरी मेकिंग इतर सर्व प्रशिक्षण संस्था, कला, वाणिज्य, विज्ञान शाखेची कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या अधिनस्त सर्व व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्था, विविध आस्थापना आणि कारखाने यांच्याकडील विहित वयोमर्यादेतील इच्छूक प्रतिभा संपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन या स्पर्धेसाठी करता येईल. तसेच या स्पर्धेत निवड झालेल्या उमेदवारांना जागतिक स्पर्धेसाठी वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन व सहाय्य महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांच्याकडून करण्यात येईल.   

     यासाठी सहभाग घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in/ या लिंकवर  भेट देऊन नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती अमिता पवार यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक