आजचा दिवस सर्वांसाठी मंगलमय --मुख्यमंत्री एकनाथ शिंदे



 

अलिबाग,दि.7(जिमाका):- सर्वांना आनंद देणारा हा भूमीपूजन सोहळा असून आजचा दिवस सर्वांसाठी मंगलमय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उरण तालुक्यातील उलवे येथे केले.

             उलवे, सेक्टर 12, नोडे उलवे, नवी मुंबई या ठिकाणी एकूण दहा एकर परिसरात साकारण्यात येणाऱ्या तिरूमला तिरुपती देवस्थानाच्या श्री वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराचे भूमीपूजन मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

              यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, डॉ.श्रीकांत शिंदे, सर्वश्री आमदार प्रशांत ठाकूर, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर, प्रसिद्ध उद्योजक रेमंड समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. गौतम सिंघानिया, तिरूमला देवस्थानचे अध्यक्ष श्री.वाय.व्ही. सुब्बा रेड्डी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, तिरुमला ट्रस्टचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

            भूमीपूजनाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा देत म्हटले की, सर्वांना आनंद देणारा हा भूमीपूजन सोहळा असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजचा दिवस मंगलमय आणि गौरवशाली आहे. प्रत्येकाला आंध्र प्रदेश राज्यात जावून तिरुपती बालाजीचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी जायला जमत नाही. अशा वेळी या ठिकाणी येवून तिरुपती बालाजीचे दर्शन होणार आहे. हे मंदीर साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल.

              महाराष्ट्रात तिरुपती बालाजीचे मंदिर साकारत असल्याबद्दल तिरूमला ट्रस्ट चे तसेच या पवित्र कामात ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले आहे, त्या सर्वांचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी शेवटी आभार मानले.

               यावेळी तिरूमला ट्रस्टचे अध्यक्ष श्री.रेड्डी यांनी या मंदिराच्या साकारण्याविषयीची थोडक्यात माहिती दिली.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक