पाणी बचतीसाठी कटिबद्ध होवू या... राष्ट्रीय कर्त्यव्य पार पाडू या..! -- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील


 

अलिबाग,दि.29 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडून देखील काही प्रमाणात पाणी टंचाई जाणवतेच. याला अनेक कारणे असली तरी वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण, वाढते नागरिकीकरण, यामुळे पाण्याचा दरडोई वापर देखील वाढला आहे. प्रदूषणामुळे पाण्याचे स्त्रोत दूषित होत आहेत. आता हे टाळण्यासाठी सर्वांनी मिळून पाणी बचतीसाठी कटिबद्ध होवू या... राष्ट्रीय कर्तव्य पार पाडू या.., असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

   जिल्ह्यात ग्रामीण भागात  पाण्याचा काटकसरीने वापर, "पाणी अडवा पाणी जिरवा" मोहीम राबविणे व पाण्याच्या काटकसरीने वापराबरोबरच या नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करण्यासाठी डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध अभिनव उपक्रम व कृतीशील पाऊले उचलली जात आहेत.

   अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सत्यजित बडे, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक श्रीमती प्रियदर्शिनी मोरे, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी  राजेंद्र भालेराव व पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी श्रीमती शुभांगी नाखले या सर्वांच्या समन्वयाने पाणी बचतीतून जलसंवर्धन उपक्रम यशस्वी करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, गट समन्वयक व समूह समन्वयक तसेच स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, जिल्ह्यातील एन.एस.एस., नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी, महिला बचतगट यांनी या उपक्रमात सक्रीय योगदान देण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.   

     यातून पाऊस पाणी संकलन, विहीर व बोअर पुनर्भरण आदि घटकांवर काम करणे सुरु आहे.

पर्यावरण प्रेमी व राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून पाणी बचतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे. नदी, नाले, झरे, तलाव, विहिरी हे जीवसृष्टीला जगवणारे पाण्याचे स्त्रोत आहेत. त्यांचे रक्षण करणे, गावातील विहिरी, बोअरवेल यांच्या सभोवताली स्लोप निर्माण करून भूमिगत बंधारे, पाझर खड्डे खोदून, वॉटर पॉंड करून पाण्याचे पुनर्भरण करावे. पावसाचे पाणी साठविण्यासाठी घरोघरी भूमिगत पाण्याचा टाक्या बसविणे. बागेसाठी व शेतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर उपयुक्त ठरणार आहे. स्थानिक प्रजातीची वृक्ष लागवड करून भूमिगत पाणी पातळीत वाढ करता येते. उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करून व पाण्याच्या अमर्याद वापराला पायबंध घातल्यास पाणी बचतीचे मोठे कार्य होऊ शकते. सर्व खाजगी व शासकीय इमारती, तसेच शाळा, अंगणवाडी, समाज मंदिरे यांच्याभोवती बांबू लागवड केल्यास व घर तिथे शोष खड्डा व परसबागांची निर्मिती केल्यास भूजल पातळी वाढ होईल. गावातील उपलब्ध मोकळ्या जागेत सलग समतल चरी खोदून त्यात पाणी अडविल्यास व जमिनीत पाण्याचे पुनर्भरण केल्याने पाणी पातळीत सुधारेल. पाणी साठविण्यासाठी विविध पर्याय म्हणून छतावरील पाऊस पाणी संकलन, कृत्रिम विहीर भूजल पुनर्भरण व फेरोसिमेंट टाक्यांची निर्मिती व बांबूची लागवड करावी. पाणी हेच जीवन व पाणी ही राष्ट्राची अमूल्य संपत्ती असल्याने प्रत्येकाने जल संपत्तीच्या संवर्धनासाठी स्वत:पासून सुरुवात केल्यास आपली भारत भूमी अधिकाधिक सुजलाम, सुफलाम व समृद्ध होईल, तेव्हा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हे राष्ट्रीय जबाबदारी पार पाडू या, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक