इरशाळवाडी आपत्ती मधून बचावलेल्या लोकांच्या पाठीशी शासन ताकदीने उभे --पालकमंत्री उदय सामंत सायं 5.30 पासून बचावकार्य कायमस्वरूपी थांबाविल्याचे केले जाहीर

 


 

अलिबाग,दि.23 (जिमाका):- इर्शाळवाडी  दुर्घटनेतून बचावलेल्या 144 लोकांच्या पाठीशी शासन ताकदीने उभे आहे. या लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. याबरोबरच जिल्हातील अन्य धोकादायक वाडया आणि गावांचे पुनर्वसन करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. दि.19 जुलै पासुन सुरु असलेली बचाव कार्य मोहीम आज दि.23 जुलै रोजी सायं. 5.30 पासून थांबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

 इर्शाळवाडी येथील बचाव कार्याचा आढावा व पाहणी संदर्भात खालापूर पोलीस स्टेशन येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी आ.महेश बालदी, आ.महेंद्र थोरवे, विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, विशेष  पोलीस निरीक्षक प्रविण पवार, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बढे , एनडीआरएफ कंमाडर श्री.तिवारी उपस्थित होते.

पालकमंत्री ना.उदय सामंत म्हणाले की, दि.19 जुलै 2023 रोजी इरर्शाळवाडी या ठिकाणी दरड कोसळल्याने या आदिवासीवाडीतील 43 घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली असून इरर्शाळवाडीतील 228 इतकी लोकसंख्या होती.  यापैकी या दुर्घटनेत 27 लोक मृत्यूमुखी, 57 लोक बेपत्ता असून 144 लोक हयात आहेत. या हयात असलेल्या लोकांचे तात्पुरत्या जागेत पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच त्यांना लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा शासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत..

या कुटुंबाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चित करून सिडको मार्फत सदर जागेचा विकास करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसेच आ.महेश बालदी यांनी विधानसभेत आयुधाद्वारे दिलेल्या माहितीनुसार 5 वाड्यांचे आणि जिल्ह्यातील 20 धोकादायक गावांचे पुनर्वसन करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही श्री.सामंत यांनी सांगितले.

 

 या दुर्घटनेच्या ठिकाणी बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, टीडीआरएफर, इमॅजिका कामगार, सिडकोचे  कर्मचारी तसेच इतर सामाजिक स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनधी असे एकूण जवळपास 1 हजार 100 लोकांनी उत्तमरित्या कामे केले त्यांचे शासनामार्फत आभार मानले. भविष्यात अशी दुर्देवी घटना घडू नये म्हणून शासन व जिल्हा प्रशासन खबरदारी घेईन असेही श्री.सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

 याठिकाणी काही ट्रेकर्स, पर्यटक, काही लोक येथील झालेली घटना बघण्यासाठी येण्याची शक्यता आहे. याठिकाणी जिल्हा प्रशासनाने 144 कलम लागू केले आहे. तरी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक