मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागास मुलींसाठी शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

 

 

अलिबाग,दि.05(जिमाका):- सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थींनीकरिता मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह गोंधळपाडा अलिबाग येथे कार्यरत आहे.

या वसतिगृहात इ.8 वी पासून गरीब हुशार होतकरू मागासवर्गीय अनुसूचित जाती- 80 टक्के, अनुसूचित जमाती 3 टक्के, विमुक्त जाती भटक्या जमाती -5 टक्के,, आर्थिक मागास व इतर मागासवर्गीय दारिद्रयरेषेखालील कुटुंबातील विद्यार्थिनी 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग -2 टक्के, अनाथ -2 टक्के, अपंग-3 टक्के यांना गुणवत्ता नुसार प्रवेश दिला जातो.  वसतिगृहात विद्यार्थींनीकरिता मोफत निवास व्यवस्था असून नाष्टा दररोज पोहे,शिरा उपीट इ.पैकी एक, उकडलेली दोन अंडी, सफरचंद, ऋतूमानानुसार एक फळ व दूध तसेच भोजन व्यवस्थेमध्ये जेवण (डाळ भात, चपाती भाजी/उसळ, लोणचे, पापड इ.सह आठवड्यातून दोन वेळा मांसाहार) देण्यात येते.

अभ्यासासाठी लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व लेखन साहित्य देखील विनामूल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून दरमहा रु 600/- निर्वाह भत्ता दिला जातो.  शालेय व गणवेश पात्र महाविद्यालयीन विद्यार्थींनींना दोन संचाकरिता गणवेश भत्ता दिला जातो.  त्या व्यतिरिक्त रेनकोट, छत्री भत्ता, संगणक, ग्रंथालय सुविधा, क्रीडा साहित्य मनोरंजन इ.अनेक सुविधा उपलब्ध आहेत.

प्रवेश पात्र विद्यार्थींनीच्या पालकांचे सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न अनुसूचित जाती, अनुसूचित,  जमाती विद्यार्थींनीकरिता रु.2 लाख 50 हजारचे आत व विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर  मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थींनीकरिता रु. 1 लाखाचे आत असावे.

 ऑफलाईन प्रवेश अर्जासोबत तहसिलदार यांच्या सहीचा सन 2022-2023 मधील उत्पन्न दाखला, जातीचे मुलकी अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, मागील इयत्ता उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक, आधारकार्ड, शाळा/कॉलेजचे बोनाफाईड, रेशनकार्ड या  आवश्यक  कागदपत्राच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे.

 सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृह प्रवेश अर्ज हे ऑफलाईन फॉर्म भरण्याकरिता व वसतिगृहाच्या अधिक माहितीकरिता गृहपाल यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल सौ.सु.एस.गुजेला यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक