इरसालवाडी येथे मदत व बचाव कार्य करून आपदग्रस्तांचे तात्पुरते तसेच कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे निर्देश जारी


अलिबाग,दि.23 (जिमाका):- दि.19 जुलै 2023 रोजी इरसालवाडी, ता.खालापूर येथे दरड कोसळून नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढावले आहे. त्याअनुषंगाने मदत व बचाव कार्य करून आपदग्रस्तांचे तात्पुरते तसेच कायम पुनर्वसनाकामासाठी विविध शासकीय विभाग आणि अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. 

उपविभागीय अधिकारी पनवेल श्री. राहूल मुंडके,आपदग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनाकामी आवश्यक यंत्र सामुग्री तसेच मनुष्यबळ पनवेल व नवी मुंबई महानगरपालिकेकडून उपलब्ध करुन घेणे.

जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड श्री.शाम पोशेट्टी, आपदग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनाकामी आवश्यक यंत्र सामुग्री तसेच मनुष्यबळ पेण, अलिबाग, खोपोली, खालापूर व कर्जत नगरपरिषदांकडून उपलब्ध करुन घेणे.

उपविभागीय अधिकारी  पेण श्री.प्रविण पवार, आपदग्रस्तांना देणेकामी संसारउपयोगी साहित्य उपलब्ध करून घेणे, हे साहित्य साठवणूकीकामी दिलेल्या कंटेनरमध्ये व्यवस्थितरित्या साठवून ठेवणे,या साहित्यांचे सूचनांप्रमाणे कुंटुंबनिहाय वाटप करणे, या साहित्याचा आवक व जावक हिशोब ठेवणे व तो वेळोवेळी जिल्हाधिकारी यांना सादर करणे

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मेट्रो सेटर क्र.1 पनवेल श्री.दत्तात्रेय नवले,मौजे नानीवली,ता. खालापूर येथे बेस कॅम्पवर उपस्थित रहाणे, दुर्घटनास्थळी येणाऱ्या अति महत्वाच्या व्यक्ती तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्या संपर्कात राहून दुर्घटना तसेच बचावकार्याबाबत सविस्तर माहिती देणे.

उपविभागीय अधिकारी कर्जत श्री.अजित नेराळे, तहसिलदार खालापूर श्री.आयुब तांबोली, मौजे इरसालवाडी, ता.खालापूर येथील बचावकार्याचे नियंत्रण करणे, बचावकार्याबाबतची माहिती वेळोवेळी नियंत्रण कक्षास देणे, विविध नोडल अधिकारी यांच्याशी समन्वय साधणे, आपदग्रस्तांच्या कायम स्वरुपी पुनर्वसनाकामी सुयोग्य जागेची निवड करुन जागा मागणीचा परीपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे, पुनर्वसीत वसाहतीच्या उभारणीचे कामकाज सुरु झाल्यानंतर त्यांचे प्रगतीवर लक्ष ठेवणे व त्याबाबतचा साप्ताहीक प्रगती अहवालआठवडयाच्या सोमवारी जिल्हाधिकारी  व निवासी उपजिल्हाधिकारी यांना सादर करणे.

उपविभागीय अधिकारी रोहा श्री.ज्ञानेश्वर खुटवड,तात्पुरत्या निवाऱ्यासाठी सुयोग्य जागा निश्चित करणे, जेएसडब्ल्यू,जे.एन.पी.टी. व जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधून कंटेनर उपलब्ध करुन घेणे,या कंटेनरमध्ये निवासाच्या अनुषंगाने वैद्यकीय, पाणीपुरवठा तसेच रस्त्याची व्यवस्था करणे, कुंटुंब संख्येनुसार संबंधिताना तात्पुरत्या निवाऱ्याकामी कंटेनरचे वाटप करणे, MSEDCLच्या मदतीने विजपुरवठा उपलब्ध करुन घेणे, केलेल्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी तसेच नियंत्रण कक्षास अवगत करणे

अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण पनवेल,श्रीमती अर्चना प्रधान, खालापूर तहसिलदार कार्यालय, या ठिकाणी नियंत्रण कक्षात उपस्थित राहाणे, दुर्घटनेच्या अनुषंगाने मदत व पुनर्वसन कार्यावर लक्ष ठेवणे, विविध नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधून विविध अहवाल वेळोवेळी शासन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे, आपदग्रस्तांना स्वत:चे स्वतंत्र नवीन घर मिळेपर्यंत सदर तात्पुरत्या पुनर्वसन केंद्राचे पालक अधिकारी म्हणून काम करणे.

अपर तहसिलदार खालापूर श्रीमती पूनम कदम, मंडळ अधिकारी वावोशी श्री.तुषार कामत, आपदग्रस्तांना विविध शासकीय निधी मिळवून देण्याकामी तालुकास्तरावरील विविध अहवाल दाखले तसेच आपदप्रस्तांची वैयक्तिक माहिती शासन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे,आपदग्रस्तांचे खराब व नष्ट झालेली कागदपत्रे व दाखले पुनर्जिवीत करण्याकामी विशेष कॅम्पचे आयोजन करुन त्यांना सदर दाखले व कागदपत्रे नव्याने उपलब्ध करुन देणे.

जिल्हा  पुरवठा अधिकारी रायगड श्री.सर्जेराव सोनवणे, मौजे इरसालवाडी, ता.खालापूर येथील मदतकार्यासाठी बाहेरून आलेल्या कर्मचारी, स्वंयसेवक व आपदग्रस्त नागरीकांच्या चहा, नाष्टा व जेवणाची व्यवस्था करणे,  आपदग्रस्तांना कुंटुंब निहाय स्वतंत्र शिधापत्रीका द्यावी, कुंटुंबनिहाय स्वतंत्र गॅस कनेक्शन व शेगडी उपलब्ध करून देणे, शासन निर्णयाप्रमाणे अनुज्ञेय असलेले मोफत धान्य व केरोसीन उपलब्ध करून देणे.

जिल्हा शल्यचिकित्सक रायगड श्री.अंबादास देवमाने, मृत व जखमी व्यक्तींचा अहवाल दर तीन तासांनी जिल्हा प्रशासनास सादर करणे, जखमी व्यक्तीच्या औषधोपचाराची व्यवस्था करणे.

जिल्हा आरोग्य अधिकारी रायगड, डॉ.मनिषा विखे, मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करून त्याचा अहवाल व पंचनामा जिल्हा प्रशासनास सादर करणे.

कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा  जिल्हा परिषद रायगड श्री.संजय वेंगुर्लेकर, घटनास्थळी बेस्ट कॅम्प आणि निवारे केंद्र येथे पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणे,चौक या ठिकाणी करण्यात आलेल्या तात्पुरत्या पुनर्वसनाच्या ठिकाणी आपदग्रस्तांना पिण्याचे शुद्ध पाणी तसेच वापरासाठी मुबलक देणेकामी साठवण टाकी व पाईपलाईन तसेच अनुषंगीक व्यवस्था करणे, त्याची वेळोवेळी देखभाल करणे, केलेल्या कार्यवाहीबद्दल सदर ठिकाणचे नोडल अधिकारी श्री.ज्ञानेश्वर खुटवड यांना केलेल्या कार्यवाहीबद्दल अहवाल सादर करणे.

कार्यकारी अभियंता, सा.बां. इलेक्ट्रिकल पेण श्रीमती संजीवनी कट्टी,घटनास्थळी विद्युत वितरण व्यवस्था पुर्ववत करणे, विद्युत व्यवस्थेच्या पर्यायी व्यवस्थेच्या अनुषंगाने कार्य करणे, तात्पुरत्या पुनर्वसनाच्या ठिकाणी कुंटुंबनिहाय विज जोडणी उपलब्ध करुन देऊन पुनर्वसीत नवीन घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सदर विजजोडणी आपदग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या घरांना स्थलांतरित करणे.

उप आयुक्त पशुसंवर्धन रायगड डॉ.रत्नाकर काळे, मृत जनावरांचे पंचनामे व जखमी जनावरांच्या औषधी व्यवस्था करणे,  मृत जनावरांचे शवविच्छेदन करून त्यांची विहित पध्दतीने विल्हेवाट लावणे व तद्अनुषंगिक कामे करणे,आपदग्रस्तांना उदरनिर्वाहासाठी शासकीय योजनेतून जनावरे व गोठे तसेच तद्नुषंगीक साहित्य उपलब्ध करुन देणे, आपदग्रस्त इरसालवाडी येथील मोकाट जनावरे व कुत्रे यांना ताब्यात घेवून त्यांना सुयोग्य ठिकाणी पोहचविणे, विविध नोडल अधिकारी तसेच नियंत्रण कक्षाशी संर्पकात राहून मदत व बचाव कार्य, शासकीय मदत वाटप करणे.

अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोकण भवन श्रीमती सुषमा गायकवाड,आपदग्रस्तांच्या पुनर्वसनाकामी गृहबांधणी व विविध नागरी सुविधांची उभारणीकामी  तयारी करणे,  सदर विकसनाचे आराखडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूर करुन घेणे, आपदग्रस्तांचे वसाहतीच्या उभारणीचे कामकाज सुरु झाल्यानंतर कामाची प्रगती व गुणवत्ता यावर लक्ष ठेवणे, सदर वसाहतीच्या संर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवणे, वसाहत उभारणे कामकाज पूर्ण झाल्यानंतर पुर्णत्वाचा दाखला व भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे, पूर्ण झालेल्या घरांचे विहीत पध्दतीने आपदग्रस्तांना वाटप करणे.

नमूद अधिकारी यांनी तात्काळ आपल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासह आपल्याला नेमून दिलेल्या कर्तव्याच्या ठिकाणी हजर रहावे. आवश्यकतेनुसार मदतीसाठी आपले अधिनस्त अधिकारी कर्मचारी यांचे आदेश निर्गमीत करावेत. ही बाब नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने असल्यामुळे यास प्रथम प्राधान्य देण्यांत येणार आहे. या बाबतीत  समन्वयासाठी निवासी उपजिल्हाधिकारी रायगड श्री.संदेश शिर्के व उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) श्री.जीवन देसाई, यांच्याशी संपर्क साधावा. असे निवासी उपजिल्हाधिकारी रायगड श्री.संदेश शिर्के यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक