इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करणार --- विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

 


 

अलिबाग,दि.22(जिमाका) :- इर्शाळवाडी दुर्घटनेतील मुले, मुली, महिला, पुरुष, एकल स्त्रिया या सर्वांचे सर्व्हेक्षण करून अधिकाऱ्यांनी त्याची व्यवस्थित नोंद ठेवावी. या ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे, यासाठी तात्काळ कार्यवाही सुरु करावी असे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या मुलांची उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी नढळ गावात जाऊन भेट घेत त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या तात्पुरत्या राहण्याची सोय असलेल्या ठिकाणी जाऊन भेट देत उपलबद्ध सुविधांची पाहणी केली.

यावेळी त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी स्वतः तत्परतेने व संवेदनशीलतेने तात्काळ भेट दिली होती. याबाबत त्यांनी सविस्तर निवेदन विधान सभेमध्ये केले होते व प्रत्येक मृत व जखमी कुटुंबाला शासनाची सर्वोतोपरी मदत जाहिर केली होती.  विधानभवनात माझी भेट घेऊन सविस्तर माहिती ही दिली होती. या भेटी वेळी त्यांनी अपादग्रस्त लोकांना तात्काळ मदत पोहचत आहे का ? तसेच सर्व मुले व महिलांना आवश्यक सुविधा दिल्या आहेत का? याबाबत या ठिकाणी जाऊन  पाहणी करण्याचेही सांगितले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

या दरम्यान त्यांनी दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी  सांगितले की, सर्वांनी एकत्रित येऊन दहा दहा लोकांचा समूह करून त्यातील एक जणाने सर्व अपादग्रस्त लोकांची जबाबदारी घ्यावी आणि काय वस्तू लागणार आहे त्याची यादी करावी व ती आम्हाला कळवावी. जेणेकरून आपण एक कुटुंब असल्यासारखं एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो.  कोणत्याही व्यक्तीसोबत गैरकृत्य होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

यावेळी आमदार श्री.महेंद्र थोरवे, आमदार श्रीमती मनिषा कायंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, तहसिलदार श्री.आयुब तांबोळी, अदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव, पोलीस उपअधीक्षक श्री. विक्रम कदम, अप्पर तहसिलदार श्रीमती पूनम कदम, नगरसेविका श्रीमती शीतल म्हात्रे, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त श्रीमती जेहलमताई जोशी, श्री.मंगेश चिवटे उपस्थित होते.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक