पेण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरु

  

अलिबाग,दि.07 (जिमाका):- औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया दि.12 जून 2023 पासून सुरू करण्यात आली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी https://admission.dvet.gov.in/ या संकेतस्थळावर दि.11 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन पेण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजिकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जावून आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावेत. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमाची माहिती देण्यात येते.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यभरात एकूण 85 व्यवसाय उपलब्ध असून 1 लाख 54 हजार 932 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जादा मागणीचे तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 652 नवीन अभ्यासक्रमाच्या तुकडया सरू करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. विविध प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनाही लागू करण्यात आली आहे. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते.  तरी दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आयटीआयमधून व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून त्वरित रोजगार, स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआय मध्ये प्रवेश घ्यावा.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था पेण येथे वीजतंत्री, फिटर, वेल्डर, प्लंबर व कॉस्मेटोलॉजी या ट्रेडच्या एकूण 128 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. तरी इच्छुकांनी तात्काळ https://admission.dvet.gov.in/ या संकेतस्थळावर प्रवेशासाठी नोंदणी करून अर्ज करावा, तसेच अधिक माहितीकरिता श्री.व्ही.डी.साळवी 9960503263 व श्री.एम.व्ही.पाटील 8087541507 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पेण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.

 

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक