17 ऑगस्ट पासून जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम

 

 

अलिबाग(जिमाका)दि.8:- रायगड जिल्ह्यातील 3 ते 18 वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी  शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोध मोहीम दि. 17 ते दि.31 ऑगस्ट 2023 दरम्यान जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी दिली.

रायगड जिल्ह्यात प्राथमिक समग्र शिक्षा कार्यक्रमाची तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ज्ञानरचनावादी शाळा, कृतीयुक्त अध्ययन पद्धती, डिजीटल शाळा, आय.एस.ओ.मानांकन, मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश, मध्यान्ह भोजन, विविध शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती परिक्षा तयारी, नवोदय परिक्षा तयारी अशा प्रभावी उपक्रमांची अंमलबजावणी अनुभवी व तज्ञ शिक्षकांमार्फत शाळांमध्ये सुरू आहे. मात्र शासनाच्या अनेक योजना सुरू असतानाही अद्याप काही बालके शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेत घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याव्यतिरिक्त बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठ, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, स्थलांतरित कुटुंबे, मागास, वंचित, अल्पसंख्याक गटातील वस्त्या, राज्यातील सर्व खेडी, गाव, वाडी, तांडे, पाडे, शेतमळे, जंगल, बालगृह, निरीक्षण गृह, विशेष दत्तक संस्था आदी ठिकाणी जाऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या नोंदी करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी सांगितले.

शाळाबाह्य मुलांच्या विशेष शोध मोहीम अंतर्गत 3 ते 6 वयोगटातील जी बालके एकात्मिक बाल विकास योजनेचा लाभ घेत नाहीत.  तसेच खाजगी बालवाडी, इंग्रजी माध्यमांचे ज्युनिअर केजी, सिनिअर केजी मध्ये जात नाहीत व 6 ते 18 वर्ष वयोगटातील शाळाबाह्य बालके यांची देखील शोधमोहिम घेण्यात येणार असल्याचेही  श्रीमती गुरव यांनी सांगितले.

या शोध मोहिमेस नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड  यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक