जिल्हास्तरीय दिशा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न अध्यक्ष खासदार श्रीरंग बारणे व सहअध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती

 

 

रायगड, (जिमाका)दि.31:- जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती(दिशा)ची खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली व समितीचे सहअध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक आज जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्ग व रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या व वाहतूक नियमानासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) च्या बैठकीनंतर संसदीय रस्ता सुरक्षा समिती व जिल्हास्तरीय विद्युत वितरण सनियंत्रण समिती यांच्या बैठका संपन्न झाल्या. या बैठकांसाठी आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, प्रकल्प संचालक श्रीमती प्रियदर्शिनी मोरे, समिती सदस्य श्रीमती दिपाली पाटील  यांसह विविध समितीनिहाय शासकीय विभागांचे विभाग प्रमुख आणि सर्व विभागांचे प्रमुख शासकीय अधिकारी उपस्थित होते.

अध्यक्ष तथा खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र शासन पुरस्कृत योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला.  ते बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले, जिल्ह्याच्या विकासावर परिणाम करणाऱ्या विविध योजनांबाबत मागील बैठकीत देण्यात आलेल्या सूचनानुसार कार्यवाही होणे अपेक्षित आहे . गणेश उत्सव व पुढील काळात रस्त्यांवरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढ होत असून ब्लॅक स्पॅाट मुळे होणारे अपघात रोखण्यासाठी संसदीय रस्ता सुरक्षा समिती मध्ये सूचना करण्यात आल्या होत्या. एक्सप्रेस वे वरील अवजड वाहतुकीचे नियमनासाठी कार्यवाही करणे, महत्त्वाच्या आठ ब्लॅक स्पॉटवर अपघातांची तीव्रता कमी करण्यासाठी सुचविलेली कामे पूर्ण करणे, यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आदींच्या अखत्यारातील मार्गावरील कामांची सद्यस्थिती सादर करावी.

मुंबई-गोवा महामार्गाची कामे अपेक्षित पद्धतीने झाली नसल्याने खासदार श्री.बारणे, खासदार श्री.तटकरे, आमदार श्री.गोगावले, आमदार श्री.दळवी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती घेत महत्त्वाच्या सूचना केल्या. मुंबई-गोवा महामार्गावर फलक लावून प्रवासी व वाहनांच्या मदतीसाठी संपर्क क्रमांक देण्यात यावेत, बंद पडलेले वाहनांच्या व विविध कारणांनी होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यामध्ये याचा उपयोग होईल. यादृष्टीने चर्चा करुन सूचना देण्यात आल्या.

बैठकीत सुरुवातीला प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम (पी एम इ जी पी )बाबत चर्चा झाली. या प्रसंगी खासदार सुनील तटकरे म्हणाले, महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार व राज्य शासन मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री यांच्या प्रेरणेतून यासाठी तयार करण्यात आलेल्या पोर्टल वरील दाखल परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्र मार्फत बँकांना पाठवण्यात येतात. बँकांनी उद्दिष्ट निहाय तातडीने प्रकरणे निकाली काढून संबंधित लाभार्थ्यांना निधी देणे अपेक्षित आहे.

 

 ते पुढे म्हणाले, परंतु त्यावर कार्यवाही होत नसल्याने विशेषत: ग्रामीण भागातील महिला विकासापासून वंचित राहत आहेत आणि रोजगार निर्मितीसाठी शासन करीत असलेल्या प्रयत्नांना यश मिळत नाही. बँकांकडून प्रस्ताव नाकारले जात आहेत. पी एम इ जी पी अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र मार्फत  प्रकरणे पाठविले जातात, यातील प्रस्ताव नाकारण्याबाबत चुकीची कार्यवाही करणाऱ्या बॅकांवर गुन्हे दाखल करावेत. बँक निहाय असलेले उद्दिष्ट त्यातील मंजूर प्रकरणे, नामंजूर प्रकरणे यांची कारणे दिली जावेत, असे खासदार श्री.तटकरे म्हणाले.

आमदार भरत गोगावले व आमदार महेंद्र दळवी यांनी रस्त्याबाबत नागरिकांना येणाऱ्या अडचणी,  जिल्ह्यातील विविध मार्गांच्या कामे गतीने पूर्ण होण्याची आवश्यकता, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व रिक्त पदांच्या सद्यस्थिती, महावितरणच्या वीज पुरवठ्यातील माहिती घेतली.

जिल्हाधिकारी डॉ.म्हसे यांनी विविध विषयांबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने समन्वय साधत करत असलेल्या कार्यवाही बाबत माहिती दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी, महानगरपालिका भागातील जिल्हा परिषद शाळा, आरोग्य केंद्रामधील रिक्त पदांबाबत तसेच जल जीवन मिशन च्या कामाबाबत माहिती दिली.

 पोलीस अधीक्षक घार्गे यांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतुकीत मोठी वाढ होणार असल्याने जास्त अडचण असलेल्या भागात दर तीन किलोमीटरवर पोलीस मदत केंद्र, बंद वाहनांना तात्काळ दूर करण्यासाठी प्रत्येक दहा किलोमीटरवर क्रेनची उपलब्धता, वाहतूक नियोजनाबाबतची माहिती फलक व चित्रफितीद्वारे माहिती देणे अशा उपाययोजना केल्याचे सांगितले.

पनवेल महानगरपालिका आयुक्त श्री देशमुख यांनी अमृत योजना (अटल मिशन फॉर रिजन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन) मधील कामाची माहिती दिली.

याप्रसंगी बैठकीत महावितरणचे मुख्य अभियंता सुनील झगडे, अधीक्षक अभियंता श्री.गायकवाड, श्री. मुलाणी,  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक यशवंत घोटकर, नीरज चोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती डॉ.मनिषा विखे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले आदींनी बैठकीत सहभागी होत विभागनिहाय माहिती सादर केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड