रायगड जिल्ह्यात दिव्यांगाच्या दारी’ ’अभियान प्रभाविपणे राबविणार -- निवासी उपजिल्हाधिकारी

 

 

रायगड(जिमाका),दि.22:-दिव्यांग कल्याण विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात ‘दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. रायगड अलिबाग जिल्ह्यात दि.29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 4 यावेळेत पनवेल येथे या अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये दिव्यांग बांधवांच्या तक्रारी, अडचणी सोडविण्या बरोबरच विविध शासकीय योजनाचा लाभ देण्यात येणार आहे. हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावे,अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी ‘दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांगाच्या दारी’ अभियान नियोजन अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक अंबादास देवमाने कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, सहायक आयुक्त समाज कल्याण सुनील जाधव, प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी शाम कदम देशमुख, यांची उपस्थिती होती.

 दिव्यांगांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने दिव्यांग कल्याण विभाग हा सामाजिक न्याय विभागापासून वेगळा करून एक नवीन विभाग तयार केला आहे. दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.

दिव्यांग व्यक्तीशी संबंधित सर्व योजना या अभियानांतर्गत जिल्ह्यातील नियोजित शिबिरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक शासकीय कार्यालयाद्वारे शासकीय योजनांचे स्टॉल्स शिबिरामध्ये लावण्यात येणार आहेत. तसेच दिव्यांगांच्या विविध योजनांबाबतच्या माहिती पुस्तिकेचे वितरण करणे, संजय गांधी निराधार योजना, जात प्रमाणपत्र, पॅन कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, मतदार नोंदणी, दिव्यांगांना युडीआयडी कार्ड वितरण, दिव्यांगांसाठी नवीन शिधा पत्रिका, दिव्यांगांना रोजगाराच्या संधी, बँकेतील कर्ज प्रकरणे, रोजगार नोंदणी इत्यादी लाभ दिव्यांगाना मेळाव्यात दिले जाणार आहे, अशी माहिती श्री शिर्के यांनी यावेळी दिली.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक