दि.17 ऑक्टोबर ते दि.30 नोव्हेंबर 2023 या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेंतर्गत करता येणार आगाऊ मतदार नोंदणी


 

रायगड(जिमाका),दि.15:- आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी 1 जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे १ जानेवारी किंवा त्याआधी 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येत होती. मात्र आता 1 जानेवारी , 1 एप्रिल,1 जुलै, आणि 1 ऑक्टोबर या तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना दि. 17 ऑक्टोबर 2023 ते दि.30 नोव्हेंबर 2023  या विशेष मोहिमेंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.

     निवडणूका न्याय्य व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदारयाद्यांचे शुद्धीकरण व अद्यावतीकरण अत्यंत महत्वपूर्ण असते. दि.17 ऑक्टोबर 2023 रोजी मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार यादी प्रकाशित केली जाईल.तसेच या कालावधीत दावे व हरकती देखील स्विकारण्यात येणार असून दि.26 डिसेंबर 2023 पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत व. दि.5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

       मतदारांनी आपले नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, मतदान ओळखपत्र क्रमांक, मतदार संघ इत्यादी तपशील मतदार यादीत तपासून ते अचूक आहेत का, याची खात्री करणे आवश्यक आहे. बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. त्यामुळे मतदारांनी दि. 17 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिद्ध होणार्‍या प्रारुप मतदारयादीतील आपले तपशील तपासणे महत्त्वाचे आहे.

दि.17 ऑक्टोबर 2023 ते दि.30 नोव्हेंबर 2023 हा कालावधी मतदार नोंदणीचा आहे.

       यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने वरील कालावधीतील दोन शनिवार व दोन रविवार या सुट्टीचे दिवशी राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.  शिवाय, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा NVSP, Voter Portal या संकेतस्थळावर आणि Voter Helpline या मोबाईल अॅपवर उपलब्ध आहेत. तरी  सदर कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून कार्यरत असणारा कर्मचारी वृंदासोबत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांनी सहकार्य करावे .तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होवून अन्य गावात गेलेल्या विवाहित स्त्रियांच्या नावांची मतदारयादीतून वगळणी केली जाईल. तसेच या कालावधीत विशेष ग्रामसभा देखील घेण्यात येणार आहेत.

     सदर कालावधीत आता पर्यंत मतदार नोंदणी न केलेल्या पात्र युवांनी मतदारयादीत आपले नाव नोंदवावे, तसेच प्रत्येक जागरूक नागरिकाने दि.17 ऑक्टोबर 2023 रोजी प्रारूप मतदारयादीतील आपले तपशील अचूक आहेत का, याची खात्री करून घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड डॉ.योगेश म्हसे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक