जिल्हा रुग्णालयात प्रत्येक बुधवारी होणार दिव्यांगांची तपासणी

 

   रायगड(जिमाका),दि.20:- नैसर्गिक अथवा अपघाताने आलेल्या दिव्यंगत्वाची तपासणी करून शारीरिक व मानसिक दृष्ट्या दिव्यांग असणाऱ्या बांधवाना जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून शासन निर्णयाच्या अनुषंगाने दिव्यांग प्रमाणपत्र वितरीत करण्यात येते. ज्या प्रमाणपत्राच्या सहाय्याने विविध शासकीय योजनांचा लाभ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळतो. या प्रमाणपत्र वितरणाच्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय रायगड-अलिबाग येथे सध्या अस्थिव्यंग व भिषक याविभागाकरिता बुधवार व नेत्र, मानसिक आणि कर्ण-मुकबधीर या विभागांकरिता गुरुवार रोजी कामकाज सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने दिली आहे.

परंतु अनेक रुग्णांना एकाधिक अपंगत्व असल्याने बुधवार व गुरुवार या दोन्ही दिवशीच्या समितीतील तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून घेण्याकरिता उपस्थित राहावे लागत होते. तसेच ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असल्याने  अनावधानाने मिळालेल्या माहितीनुसार रुग्ण व त्याचे नातेवाईक चुकीच्या दिवशी प्रमाणपत्राकरिता रुग्णांना घेऊन आल्यास, तपासणी समितीचे बोर्ड त्या दिवशी अद्ययावत नसल्याने तपासणी करून देखील प्रमाणपत्र वितरीत करणे शक्य होत नाही. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना निराशेला सामोरे जावे लागते.

      सदर रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन, दि. 01 ऑक्टोबर 2023  पासून अस्थिव्यंग, भिषक, नेत्र, मानसिक आणि कर्ण-मुकबधीर या सर्व विभागातील दिव्यांग बांधवांची तपासणी प्रत्येक बुधवारी जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग येथे एकाच दिवशी करण्यात येईल असा निर्णय  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी घेतला आहे.

  त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे प्रत्येक शुक्रवारी व उप जिल्हा रुग्णालय, माणगाव येथे महिन्यातील पहिल्या बुधवारी तसेच आवश्यकतेनुसार उप जिल्हा रुग्णालय, महाड येथे दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबीर संपन्न होईल.  कर्ण-मुकबधीर आणि ज्या रुग्णांच्या तपासणीकरिता सीटी स्कॅन अहवाल आवश्यक आहे, अशा रुग्णांची तपासणी प्रत्येक बुधवारी जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे होईल असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी कळविले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक