स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणार-- डॉ.भरत बास्टेवाड

 

 

रायगड(जिमाका) 13 :- महात्मा गांधी  जयंतीचे औचित्य साधून दि.2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी स्वच्छ भारत दिवस 2023 च्या निमित्ताने दि.15 सप्टेंबर ते दि.02 ऑक्टोबर 2023 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता ही सेवा अभियान प्रभावीपणे राबविले जाणार, असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी दिली.

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत कचरामुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अभियानांतर्गत ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचे उपक्रम राबविणे आवश्यक असून, यामध्ये स्वयंस्फुर्तीने श्रमदान करणे गरजेचे आहे. या स्वच्छता मोहिमेत ग्रामीण भागातील बसस्थानके, पर्यटन स्थळे, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले यासह इतर सार्वजनिक ठिकाणी मोहिम राबविली जाणार आहे. स्वच्छतेसाठी युवकांच्या नेतृत्वाखाली सर्व गटांना एकत्रित करून त्यांच्याकडून स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून पर्यावरण विशेषतः टेकड्या स्वच्छ करण्यासाठी राज्यभरात दि.17 सप्टेंबर रोजी स्वच्छता मोहिमेसह इतर उपक्रमांचेही आयोजन करण्याचे निर्देश केंद्र शासनाकडून देण्यात आले आहेत.

केंद्रीय जल शक्ती मंत्रालय, गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय यांच्या हस्ते दि.15 सप्टेंबर रोजी व्हिडीओ कॉनफरस द्वारे संयुक्तपणे स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तसेच ग्रामीण शहरी स्थानिक स्वराज्य संस्थाचे इतर अधिकारी यांच्यासोबत ऑनलाईन संवाद साधणार आहेत.

स्वच्छता मोहिमेत नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालयीन युवक, बचतगट, व्यापारी संघटना प्रतिनिधी, स्वच्छता प्रेमी नागरिकांनी सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक