"एक तारीख एक तास” स्वच्छता मोहिमेला रायगड जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद जिल्हाधिकारी डॉक्टर म्हसे यांच्या उपस्थितीत काशीद समुद्रकिनारी मोहिमेचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.घार्गे यांच्या उपस्थितीत वर्सोली बीचवर स्वच्छता मोहिम


अलिबाग (जि.मा.का.), दि.१ :-जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण  ठिकाणी   “एक तारीख एक तास” ही स्वच्छता मोहीम लोकसहभागातून मोठ्या उत्साहात संपन्न झाली. लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी, नागरिक, विद्यार्थी , स्वयंसेवक,  शासकीय अधिकारी कर्मचारी आणि मान्यवरांनी स्वत: हातात झाडू घेऊन श्रमदान केले आणि स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या मोहिमेत  सहभाग घेतला. उद्या (२ ऑक्टो) रोजी महात्मा गांधी यांची जयंती असून त्यानिमित्त स्वच्छतेची मोहीम ही लोक चळवळ झाली दिसून आले. नागरिकांच्या श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. 

      जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते . काशिद समुद्र किनारी येथे जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांच्या हस्तेे शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी , मुरुड तहसीलदार राहुल शिंदे,  यासह  काशीद विद्यालय, अंजुमन इस्लाम महाविद्यालयाचे विद्यार्थी, युवक ,ग्रामस्थ , स्थानिक लोकप्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.

     जिल्हाधिकारी डॉ म्हसे यांच्या उपस्थितीत काशीद समुद्रकिनारी नागरिकांचा मोठा सहभाग लाभला.  स्वच्छतेत रायगड जिल्हा अव्वल स्थानी नेण्यासाठी याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना प्रतिज्ञा दिली.  या मोहिमेत सर्वांनी घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागासाठी धन्यवाद व्यक्त केले. यावेळी समुद्रकिनारी ओला कचरा व सुका कचरा स्वतंत्र टाकण्यासाठी उभारण्यात आलेल्या डस्टबिनचे तसेच महिलांसाठी सॅनेटरी नॅपकिन च्या वेंडिंग मशीनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्वच्छता मोहिमेत समुद्रकिनारी अंमली पदार्थांचे पाकिट आढळून आले . 

---

"स्वच्छता हीच सेवा " उपक्रम


रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रविवारी वरसोली समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड,  जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी वर्सोली समुद्र किनारी बीच परीसरात स्वच्छता केली.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यांनी हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेस रायगड जिल्ह्यात शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, नागरिक यांचे सहभागातून मोहीम राबविण्यात आली. केंद्र शासनाच्या प्राप्त सूचनांनुसार आज १ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. 

---

जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे स्वच्छता मोहिम


आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत "स्वच्छता हीच सेवा" हा उपक्रमात जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग  येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

डॉ.  अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या  उपस्थितीत व मार्गदशनाखाली   सकाळी १० वाजता स्वच्छता करण्यात आली. 

          यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.देवमाने, डॉ. शीतल जोशी, अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक  रायगड, डॉ. आशिष मिश्रा, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य), डॉ. एम. एस. क्षीरसागर, प्रशासकीय अधिकारी, श्री. राजेश केणी, कार्यालयीन अधीक्षक श्री. संजय माने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डापकू व विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग होता.

       सामान्य रुग्णालय अलिबाग  येथील परीसरात

वैद्यकीय अधिकारी, मेट्रन, अधिपरिचारिका, परिचारिका, नर्सिंग स्कूल च्या विद्यर्थिनीं, कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी, डापकू विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सदर मोहिमेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन रुग्णालयीन परिसराची स्वच्छता केली. 

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक