सक्रीय क्षयरुग्ण शोधमोहिम रायगड जिल्ह्यात यशस्वीपणे राबविली जाणार--मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत वास्टेवाड

 

 

रायगड,दि.05(जिमाका):- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत सक्रीय क्षयरुग्ण शोधमोहिम अभियान दि.3 ते दि.23 ऑक्टोंबर 2023 या कालावधीमध्ये अतिजोखमीच्या भागात राबविण्यात येत आहे. तरी या मोहिमेमध्ये नागरीकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या घरी येणाऱ्या पथकास घरातील सर्व सदस्यांची तपासणी करण्यास सहकार्य करावे तसेच आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहिम रायगड जिल्हयात 100 टक्के यशस्वीपणे राबवून जास्तीत जास्त नवीन क्षयरुग्ण शोधून उपचाराखाली आणले जातील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत वास्टेवाड यांनी दिली आहे.

या मोहिमेसाठी रायगड जिल्ह्यातील एकूण 16 क्षयरोग पथकांतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय स्तरावर आशा स्वयंसेविका पुरुष स्वयंसेवक, क्षेत्रिय कर्मचारी व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे पथक घरो घरी जाऊन भेटी दरम्यान क्षयरोगाविषयी माहिती तसेच मार्गदर्शन करणार आहेत. निदान झालेल्या क्षयरुग्णांना केंद्र शासनामार्फत त्यांचे उपचार सुरू असेपर्यंत त्यांच्या बँक खात्यात दरमहा 500 रुपये निक्षय पोषण योजनेंतर्गत पोषण आहारासाठी देण्यात येतात. या मोहिमेमध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय स्तरावर मोफत निदान व उपचार सुविधा पुरविण्यात येणार आहेत तसेच प्रधानमंत्री टीवी मुक्त कार्यक्रमांतर्गत समाजातील दानशुर व्यक्ती, संस्था यांनी निक्षय मित्र होऊन क्षयरुग्णांना मोफत शिधा वाटप करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवून क्षयरोग मुक्त भारत करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड  यांनी केले आहे.

या मोहिमेकरीता 153 पथकांची नियुक्ती करण्यात आली असून त्याद्वारे जिल्ह्यातील विविध अतिजोखमीच्या भागांमधील 73 हजार 850 घरांना भेटी देऊन 3 लाख 36 हजार 271 लोकसंख्येची या पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, राजिप श्रीम.डॉ.मनिषा विखे यांनी दिली आहे.

या तपासणीमध्ये क्षयरोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांचे समुपदेशन पथकातील आशा स्वयंसेविकांमार्फत करून या संशयित क्षयरुग्णांची मोफत थुंकी व एक्स-रे तपासणी नजिकच्या शासकीय दवाखान्यात करण्यात येणार आहे. यामधून क्षयरोगाचे निदान झालेल्या क्षयरुग्णांना त्वरीत मोफत औषधोपचार सुरु करण्यात येतील. क्षयरोगाची लक्षणे दोन आठवडयापेक्षा अधिक कालावधीचा खोकला, ताप, वजनात लक्षणीय घट होणे, भूक मंदावणे, मानेवर गाठी येणे, थुंकीदवारे रक्त पडणे याप्रकारची लक्षणे असलेल्या संशयित क्षयरुग्णांनी स्वतः हून पुढे येऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी, रायगड डॉ. सचिन जाधव यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक