जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात ग्रंथालय सदृश्य अभ्यासिका उपलब्ध


 

        रायगड,दि.05(जिमाका):-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग येथे करिअर विषयक साहित्य, ग्रंथालय सदृश्य अभ्यासिका योजना उपलब्ध आहे. ही योजना राज्य शासनाची असून बदलत्या आर्थिक व्यवस्थेमुळे पारंपारीक नोकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. बहुतेक बेरोजगार तरुणाला रोजगाराच्या नवनवीन संधीबाबतची माहिती नसल्याने तथा त्यास अनुरूप पात्रता ते धारण करीत नसल्याने मोठया संख्येने राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील उमेदवार हे रोजगारापासून वंचित राहतात. यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग या कार्यालयात बेरोजगारांना विविध व्यवसाय मार्गदर्शन साहित्य, स्पर्धा परिक्षांची माहिती देणारी मासिके, पुस्तके इ.उपलब्ध करुन देणे,अभ्यासिकेची व्यवस्था करणे, नवीन नवीन संधींची व रोजगाराची माहिती उपलब्ध करुन देणे या उद्देशाने ग्रंथालय सदृश्य अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी दिली आहे.

या ग्रंथालय सदृश्य अभ्यासिकेत विविध विषयांवरील स्पर्धापरिक्षांकरिता उपयुक्त असलेली पुस्तके, मासिके तसेच सर्व प्रकारची वर्तमानपत्रे विद्यार्थ्यांना विनामूल्य वाचनास उपलब्ध आहेत. ही पुस्तके वाचण्यासाठी स्वतंत्र अभ्यासिका कक्ष उपलब्ध आहे. यामध्ये बसून मुलांना ही पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येतात. त्यासाठी विद्यार्थ्यांस स्वतंत्रपणे टेबल व खूर्च्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. कार्यालयीन वेळेत विद्यार्थी येथे दिवसभर बसून पुस्तके वाचू शकतात. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय तसेच स्वच्छतागृह येथे उपलब्ध आहे. ग्रंथालय सदृश्य अभ्यासिका व करिअर विषयक मार्गदर्शन या सुविधा विद्यार्थ्यांना विनामुल्य पुरवल्या जातात.

 तरी रायगड जिल्हयातील सर्व बेरोजगार तरुण/तरुणींनी या विनामूल्य शासकीय योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार, यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक