विकसित भारत संकल्प यात्रा मोहिम केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा -संचालक अणुऊर्जा विभाग इ.रविंद्रन

 


 

रायगड दि.20 (जिमाका):- केंद्र शासनाच्या  योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा. यासाठी शहरी भागाबरोबर ग्रामीणस्तरावर अधिक काम करा, अशा सूचना अणुऊर्जा विभागाचे संचालक श्री.इ.रविंद्रन यांनी दिल्या.

  भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यत वेळेत पोहोचावेत याची खात्री करण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली असून ही यात्रा दि.15 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत पार पडणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केलेले अणुऊर्जा विभागाचे संचालक श्री.इ.रविंद्रन (भा.प्र.से) यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आढावा घेतला.

                यावेळी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा नियेाजन अधिकारी ज.द.मेहत्रे, उपजिल्हाधिकारी सा.प्र. विठ्ठल इनामदार आदींसह विविधि संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

              या योजनच्‍या अंमलबजावणीसाठी राज्‍यस्‍तरावर मुख्‍य सचिवांच्या अध्‍यक्षतेखाली व जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हाधिकाऱ्यांच्या अध्‍यक्षतेखाली समिती स्‍थापन करण्यात आलेली आहे.

             बैठकीच्या सुरुवातीला अणुऊर्जा विभागाचे संचालक श्री.इ.रविंद्रन यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे विकसित भारत संकल्प यांत्रा योजनेच्या अनुषंगाने माहिती दिली.

श्री.रविंद्रन म्हणाले की, भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनेचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी .15 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत विकसित भारत संकल्प यांत्रा ही मोहिम राबविण्याचे ठरविले आहे. आदिवासी 110 जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडयापासून योजनेची अंमलबजावणी करावयाची आहे. विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरुकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद वैयक्तिक कथा/अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे ही  विकसित भारत संकल्प यात्रेची मुख्य उद्दिष्टे आहेत.

 

            या योजनेच्या अंमलबजावणीठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांना अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सह अध्यक्ष व निवासी उपजिल्हाधिकारी यांना सदस्य सचिव म्हणून घोषित करण्यात आले आहेत.  तालुका स्तरावर तहसिलदार नोडल अधिकारी हे असून उपविभागीय अधिकारी यांचीसमन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. महानगरपालिका, नगर परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर 10 ते 12 सदस्यांचा समावेश असलेले समिती गठित करुन समन्वय अधिकारी नियुक्त करावयाचे आहेत. केंद्र शासनाच्या विविध शहरी 17 व ग्रामीण 17 योजनेच्या अनुषंगाने प्राधान्याने ही मोहिम राबवायची आहे

  जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हणाले की, केंद्र शासनाच्या योजना ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणावर पोहोचविण्यासाठी, त्यांचा लाभ येथील लाभार्थ्यांना मिळण्याच्या दृष्टीने ग्रामीण स्तरावर यामध्ये अधिक काम वाढवा. गावामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यासाठी प्रेरणा द्या. सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांची मदत घ्या. या योजना तळागाळातील प्रत्येकांपर्यंत पोहोचविण्यासाठी, त्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी काम करा. या योजनेची अधिकाधिक माहिती लोकांना कळावी, यासाठी चांगले काम करा अशा सूचना त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात जागृतीसाठी प्रसिध्दीची योजना तयार करणे व त्यासाठी माहिती व जनसंपर्क अधिकाऱ्यांचे सहाय्य घेणे, महानगरपालिका, नगर परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर 10 ते 12 सदस्यांचा समावेश असेल अशी समन्वय समिती गठीत करण्याच्या व प्रत्येक कामासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना देणे, माहिती/फोटो/व्हिडीओ भ्रमणध्वनीवरून अपलोड करण्याच्या सूचना देणे. स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी, लाभार्थी, व्यापक जनसहभाग व जिल्हा समन्वयक यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात यावी.

            बैठकीचे प्रास्ताविक व आभार  निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के मानले.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड