“ब्लॅक स्पॉट” वरील अपघात कमी करण्याकरिता तात्काळ व दीर्घकालीन उपाय कराव्यात -- जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे



 

रायगड,दि.21(जिमाका):- रायगड जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात निश्चित करण्यात आलेल्या ब्लॅक स्पॉटस् ची संबंधित विभागांनी तातडीने पाहणी करून ब्लॅक स्पॉटस् वरील अपघात कमी करण्याकरिता तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी संबंधित विभागांच्या उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात रस्ता सुरक्षा समिती आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ कोकण भवन, नवीमुंबई श्रीमती सुषमा गायकवाड, जिल्हा नियेाजन अधिकारी ज.द.मेहत्रे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग जगदीश सुखदेवे, पनवेल उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, पेण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, एमएसआरडीसी मुंबई बांद्रा चेतन वाणी, एमएसआरडीसी पुणे सी.जी.जाधव आदींसह सार्वजनिक बांधकाम विभाग, उप प्रादेशिक परिवहन, राष्ट्रीय महामार्ग व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

             यावेळी जिल्हाधिकारी डॉ.योगशे म्हसे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अख्यत्यारित असलेले ब्लॅक स्पॉटस्, राज्य महामार्ग यांच्या अख्यत्यारित असलेले रस्त्यावरील  ब्लॅक स्पॉटस् व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अख्यत्यारित असलेल्या ब्लॅक स्पॉटस् ची परिवहन विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत तातडीने संयुक्त पाहणी करुन  ब्लॅक स्पॉटवरील अपघात कमी करण्याकरिता तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक चिन्हांचे बोर्ड, मार्गदर्शक चिन्हांचे बोर्ड, वेगमर्यादेचे बोर्ड, रमलर स्ट्रिप्स, कॅट आईस व ब्लिंकर्स बसविण्यात यावेत. कशेडी घाटामध्ये आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक बोर्ड, मार्गदर्शक बोर्ड, वेगमर्यादेचे बोर्ड बसविण्यात यावेत. महामार्गावरील पेट्रोल पंप, हॉटेल्स यांनी रस्त्यावर अवैधरित्या रस्ता दुभाजक बनविलेले असून त्यामुळेही अपघात होण्याची शक्यता असते, यासाठी महामार्गावरील रस्ता दुभाजक बंद करण्याची आवश्यक कार्यवाही संबंधित विभागाने करावी.

अपघातातील मृत्यूचे प्रमाण हे शून्यावर आणायचे आहे. अपघात कमी करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, वाहनचालकांनीही कर्तव्यभावनेने याकडे पाहिले पाहिजे. वाहतूकीचे नियम मोडण्यासाठी नसून ते पाळण्यासाठी आहेत. नियम पाळणे हे संस्कृत समाजाचे लक्षण आहे. त्याचे पालन केले तरच अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते. अपघातात एखादी व्यक्ती दगावते, तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबावर मोठा आघात होतो. नियम धुडकावण्याची वृत्ती, दुसऱ्याच्या मार्गात खोडा घालणे, त्याला मागे टाकून कसे पुढे जाता याईल, याचा विचार करणे, छोट्या गोष्टींमध्ये अहंकार डोकावणे या प्रवृत्ती रस्त्यावर अपघात होतात. रस्ता सुरक्षा  प्रत्येक नागरिकांच्या हातात आहे .

घरातील कमवणारी एक व्यक्ती अपघातामध्ये मृत्यूमुखी पडली तर सपूर्ण कुंटुंब विस्कळित होते. वाहतूक सुरक्षा बद्दल ज्ञान आपल्यापर्यंत मर्यादीत न ठेवता ते इतरांना ही द्यावे जेणेकरून अपघात टाळण्यासाठी मदत होईल. वाहतूक हा सर्व नागरिकांचा विषय आहे. पालकांनी व वाहन मालकांनी आपले वाहन कोणाकडे देत आहोत, याची काळजी घेतली पाहिजे. अपघात टाळण्यासाठी मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक हे नेहमी लक्षात ठेवावे. सध्याच्या रहदारीचा विचार करता वाहनचालकाकडे एकाग्रता, चिकाटी, संयम, असे अनेक गुण अपेक्षित आहेत.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक