चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी झाली राज्यस्तरीय रंगीत तालीम जिल्ह्यातील वरसोली, केंवाग तांडा, नाव्हा-शेवा,मुरुड,श्रीवर्धन,दिवेआगर,दासगाव गावांचा समावेश

 

 

रायगड (जिमाका) दि.9:-: जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील वरसोली (आरसीएफ कॉलनी कुरुळ), उरण तालुका केगाव तांडा, पनवेल तालुका नाव्हा-शेवा, ता.मुरुड, ता.श्रीवर्धन, दिवेआगर, ता.श्रीवर्धन, दासगाव, ता.महाड या 7 गावांमध्ये व आर.सी.एफ.थळ, ता.अलिबाग, ओ.एन.जी.सी.कंपनी ता.उरण, पाताळगंगा एमआयडीसी पार्क/रसायनी, उरण गॅस पॉवर प्लांट ता. उरण  या 4 कंपन्यामध्ये, तसेच धरमतर, रेवदंडा, ता.अलिबाग, उलवे ता.पनवेल, दिघी ता.श्रीवर्धन व इतर मासेमारी जेट्टीच्या ठिकाणी वादळवामध्ये अडकलेल्या मच्छिमारांच्या शोध व बचावाचे कार्य करणे अनुषंगाने आज चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी रंगीत तालीम झाली. महसूल, ग्रामविकास, पोलीस, आरोग्य, पाटबंधारे, अग्नीशमन, इंडस्ट्रीयल सेफ्टी ॲण्ड हेल्थ, मत्स्यविभाग, राज्य परिवहन, सार्वजनिक बांधकाम, आपदा मित्र, भारतीय तटरक्षक, मेरीटाईम, एनडीआरएफ आदी प्रमुख विभागांनी आपली सज्जता यावेळी दाखविली.

            चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी होणाऱ्या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालय स्तरावर दोन वेळा बैठक घेऊन विविध विभागांना सूचना देण्यात आल्या होत्या. रंगीत तालीमच्या अनुषंगाने 7 तारखेला नियोजन करण्यात आले होते. सकाळी साडेआठ वाजल्यापासून विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी हजर झाले होते. गावांमधून इशारा देवून सतर्क करणे, आवश्यक साधनसामुग्रीच्या सहाय्याने जखमिंना वाचविणे, जखमिंना रुग्णवाहिकेपर्यंत नेणे, रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करणे, समुद्रात असणाऱ्या व्यक्तींना लाईफ बोट, लाईफ जॅकेट, दोरी आदीच्या सहाय्याने वाचवून किनाऱ्यावर आणणे आदी प्रात्याक्षिके विविध विभागांनी आजच्या रंगीत तालीमेत सादर केली.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी जिल्हास्तरावरुन या रंगीत तालीमेचे नियंत्रण केले.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक