इर्शाळवाडी दुर्घटनेतील अनाथ बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासन कटीबद्ध-- महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे


 

रायगड (जिमाका) दि.9 :- इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,त्यांना आवश्यक त्या सुविधा देण्यात येतील असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.

 महिला व बालविकास विभाग आणि जसलोक हॉस्पिटल यांच्या सौजन्याने इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या बालकांची आरोग्य तपासणी व आरोग्य किट वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

 यावेळी विभागीय उपायुक्त श्रीमती सुवर्णा पवार, कर्जत प्रांताधिकारी अजित नैराळे, तहसिलदार आयुब तांबोळी, ण प्रकल्प अधिकारी,आदिवासी विकास विभाग पेण श्रीमती शशिकला अहिरराव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  विनीत म्हात्रे, जिल्हा परिवीक्षा अधिकारी अशोक पाटील, परिवीक्षा अधिकारी योगीराज जाधव, संरक्षण अधिकारी दीप्ती रामरामे,माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती अपेक्षा कारेकर, चौक सरपंच श्रीमती रितू  ठोंबरे, वसांबे सरपंच उमताई मुंढे, तसेच जसलोक रुग्णालयाचे सीइओ  जितेंद्र हरियान व त्यांची आरोग्य टीम उपस्थित होते.

यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती  तटकरे म्हणाल्या की, इर्शाळवाडी दुर्घटना हा एक  वेगळा आणि विदारक अनुभव आहे. नैसर्गिक आपत्ती घटना घडल्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटत असतात.  नैसर्गिक आपत्तीतील बाधितांचे पुनर्वसन व त्यांना आवश्यक सुविधा पुरविणे ही लोकप्रतिनिधींची  महत्वाची जबाबदारी असते.  या सर्व बालकांचे वय वर्षे 21पूर्ण होईपर्यंत त्यांची आरोग्य तपासणी आणि उपचार केले जाणार आहेत. या हॉस्पिटल बरोबर समन्वय साधण्यासाठी संपर्क अधिकारी नेमण्यात यावा, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. या बालकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी जसलोक हॉस्पिटलने हेल्थ कार्ड देण्यासाठी पुढाकारा घेतला त्याबद्दल विशेष आभार मानले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  इर्शाळवाडीचे पुनर्वसन एका वर्षाच्या आत पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला असून लवकरच लोकार्पण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आई-वडील नसलेल्या बालकांचे शासनाच्या पुढाकारातून संगोपन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

यावेळी  महिला व बालविकास मंत्री कु.आदिती  तटकरे यांच्या हस्ते दोन बालकांना अनाथ प्रमाणपत्र व चार बालकांना बाल संगोपन योजना मंजूर आदेश प्रमाणपत्र, दिवाळी फराळ व जसलोक रुग्णालयाकडून प्रदान आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी मंत्री कु.तटकरे यांनी प्रथम बालकांना व उपस्थित ग्रामस्थांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमला इर्शाळवाडीतील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड