शेतकऱ्यांनी आंबा पिकाची काळजी घ्यावी-उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे,


 

रायगड(जिमाका)दि.12:- बदलत्या हवामानामध्ये शेतकरी बांधवांनी आपल्या आंबा पिकाचे निरीक्षण करुन वेळीच उपाययोजना कराव्यात, जेणेकरून किड व रोगांपासून आपल्या आंबा पिकाचे संरक्षण होईल, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे यांनी दिली आहे.

यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात :- आंबा पालवीवर तसेच मोहरावर करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येण्याची शक्यता असून रोगामुळे कोवळ्या पानांवर करड्या तपकिरी रंगाचे खोलगट आणि पिवळसर कडा असलेले डाग दिसून येतात. करपा रोगामुळे मोहोर तांबुस होवून वाळतो तसेच फुलगळ होते. रोगास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्बन्डॅझिम 12 टक्के + मन्कोझेब 63 टक्के या संयुक्त बुरशीनाशकाची नाशकाची 20 ग्रॅम प्रति 10लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 आंबा बागेमध्ये कोवळया पालवीवर मिज माशी तसेच शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येण्याची शक्यता असून शेंडे पोखरणारी अळी पालवीच्या दांड्याला छिद्र पडून आत शिरते व आतील भाग पोखरून खाते. परिणामी किडग्रस्त फांदी सुकून जाते. प्रादुभित भागात अळीची विष्ठा व मृतपेशी आत राहिल्यामुळे फांद्यांवर गाठी निर्माण होतात व अशा फांद्या अशक्त राहतात. मिजमाशी प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी बारीक गाठी निर्माण होतात व नंतर त्या ठिकाणी छोटेसे छिद्र असलेला काळा डाग दिसून येतो. किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास प्रादुर्भाव कमी असताना किडग्रस्त पालवी किडीच्या अवस्थेसह काढून नष्ट करावी आणि नियंत्रणासाठीक्विनोलफॉस 25 टक्के प्रवाही 20 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मिजमाशी तसेच फळमाशी व्यवस्थापनासाठी आंबा झाडाच्या विस्ताराखालील जमीन नांगरावी किंवा झाडाखाली माती 10 ते 12 सेमी खोल उकरून घ्यावी जेणे करून किडीच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होईल.

ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असल्याने पालवी ते मोहोर अवस्थेत असलेल्या आंब्यावर तुडतुड्यांच्या प्रादूर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. तुडतुडे मोहारातील, कोवळया पालवीतील रस शोषून घेतल्यामुळे माहोराची गळ होते यासोबतच तुडतुडे मधासारखा चिकट पदार्थ शरीरावाटे बाहेर टाकतात आणि तो पानांवर पडल्यामुळे त्यावर काळी बुरशी वाढते. बागेचे वेळोवेळी सर्वेक्षण करून तुडतुडे पिल्लांच्या अवस्थेत असतानाच किटकनाशकाची फवारणी करावी. प्रादूर्भाव दिसून येत असल्यास डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के प्रवाही 9 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण झाडावर तसेच खोडावर फवारणी करावी.

 बॉगे फुटण्याच्या अवस्थेत असलेल्या आंब्यावरील तुडतुडे व भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी लॅम्बडासायहॅलोथ्रीन 5 टक्के प्रवाही 6 मि.ली + हेक्झाकोनाझोल 5 टक्के प्रवाही 5 मि.ली. किंवा पाण्यात विरघळणारे 80 टक्के गंधक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मोहोर फुटलेल्या आंबा बागेमध्ये मोहोरावरील तुडतुडे, मिजमाशी व भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड 17.8 टक्के प्रवाही 3 मि.ली. किंवा ब्युफोफेझीन 25 टक्के प्रवाही 20 मि.ली. 5 टक्के हेक्झाकोनाझोल 5 मि.ली. किंवा पाण्यात विरघळणारे 80 टक्के गंधक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी मोहोर फुलण्यापूर्वी करावी.

मोहोर नुकताच फुलत असताना ते फलधारणा होईपर्यंत किटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी. फवारणी करणे गरजेची असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांवर होणारा परिणाम टाळण्यासाड़ी परागीकरणाचा कालावधी वगळून (सकाळी 09.00 ते 12.00) फवारणी करावी. किटकनाशक किंवा बुरशीनाशकाची फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस करावी

या अगोदर फवारणी घेतली असल्यास किड व रोगाच्या प्रादूर्भावाकडे झाडाचे निरीक्षण करावे आणि प्रादुर्भाव दिसून येत असल्यास उपाय योजना कराव्यात. अधिक माहीतीसाठी कृषि विद्यापीठातील तज्ञ, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषि पर्यवेक्षक किंवा कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक