शासन आपल्या दारी” कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सर्वांनी योगदान द्यावे--जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे

 

 

  रायगड(जिमाका)दि.29:- शासनाच्या विविध योजना खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने शुक्रवार दि.5 जानेवारी 2023 रोजी  दु. 12.30 वा माणगाव तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे शासन आपल्या दारी या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

            या कार्यक्रमाबाबत माहिती देतांना जिल्हाधिकारी श्री.म्हसे पुढे म्हणाले  अनेक नागरिक हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही ते केवळ संबंधित शासकीय कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात. शासकीय योजनांसाठी पात्र असलेले लाभधारक व शासन यांच्यामध्ये अधिक समन्वय व्हावा व जबाबदार शासनाचा प्रत्यय सर्वसामान्यांना मिळावा, यासाठी शासनाने शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  आहे.  या कार्यक्रमासाठी 75 हजार लोकांचे नियोजन करण्यात आले असून या लोकांना ने-आण करण्यासाठी 1 हजार बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच 1 हजार खाजगी वाहनांचेही नियोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी 12 एकर जाग्यावर मंडप उभारण्यात येणार आहे. या मंडपामध्ये विविध शासकीय विभागांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत.  यामध्ये सर्व शासकीय विभागांचे दाखले वाटप करण्यात येणार आहे. एक एकर जागेत कृषी प्रदर्शन स्टॉल उभारण्यात येणार असल्याचे सांगून श्री.म्हसे पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील असलेल्या 1 हजार 500 औद्योगिक कंपन्यांचे सुरक्षाविषयक मार्गदर्शनाचे प्रदर्शन उभारण्यात येणार आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य चिकीत्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात कॅन्सर आजाराच्या निदानासंबंधी टाटा मेमोरियलशी समन्वय साधून त्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

जिल्ह्यातील हा कार्यक्रम सर्वात मोठा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आवश्यक पूर्व तयारी सुरु आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महसूल, कृषी, आरोग्य, रोजगार व स्वयंरोजगार, कामगार, दिव्यांग यासह विविध शासकीय विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचे लाभ विक्रमी संख्येने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे.  जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास  उपस्थित राहून शासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ म्हसे यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक