विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार याद्या प्रसिध्द मतदार यादीमध्ये 8 हजार 770 मतदारांची निव्वळ वाढ

 


 

रायगड (जिमाका)दि.23:- विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर 2023 च्या प्रारुप मतदार यादीत 58 हजार 203 मतदारांची नाव नोंदणी झाली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये 8 हजार 770 मतदारांची निव्वळ वाढ (Net Addition) होऊन एकूण मतदारांची संख्या 23 लाख 16 हजार 515 आहे. मतदार नोंदणी कार्यालयामध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. मतदारांनी मतदाता सेवा पोर्टल या संकेतस्थळावर जावून मतदार यादीतील आपले नाव तपासावे तसेच यादी नाव नसलेल्या नागरिकांनी 6 क्रमांकाचा अर्ज भरुन मताधिकारी सुनिश्चित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड डॉ.योगेश म्हसे यांनी केले आहे.

यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्वाच्या निवडणूका घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यांत आली होती. जिल्ह्यात दि.01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात राबविण्यात आलेल्या मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला आहे.

निवडणूका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण तसेच शुध्दीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी मा.भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवला जातो. दि.27 ऑक्टोबर 2023 रोजी मा. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारुप यादी प्रकाशित करुन 2024 च्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. हा कार्यक्रम दि.27 ऑक्टोबर 2023  ते दि.23 जानेवारी 2024 या कालावधीत राबविण्यात आला.

या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर 2023 च्या प्रारुप मतदार यादीत 58 हजार 203 मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच 49 हजार 433 मतदारांची वगळणी करण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये 8 हजार 770 मतदारांची निव्वळ वाढ (Net Addition) होऊन एकूण मतदारांची संख्या 23 लाख 16 हजार 515 इतकी झाली आहे. त्यानुसार 1 हजार 768 पुरुष मतदारांची 6 हजार 965 स्त्री मतदारांची आणि 37 तृतीयपंथी मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायटया यांच्या सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री पुरुष गुणोत्तर 962 वरुन 966 इतके झाले आहे.

या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये 18 ते 19 वयोगटातील 13 हजार 440 मतदारांची नव्याने भर पडली आहे. तसेच 20 ते 29 वयोगटात 18 हजार 494 मतदारांची वाढ झालेली आहे. प्रारुप यादीत 18 ते 19 या वयोगटाची मतदार संख्या 10 हजार 737 (0.47 टक्के) होती, ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत 24 हजार 177 (1.04 टक्के) इतकी झाली आहे. तर 20 ते 29 वयोगटाची प्रारुप यादीतील मतदार संख्या 4 लाख 7 हजार 258 (17.65 टक्के) होती ती अंतिम यादीत 4 लाख 25 हजार 751 (18.38 टक्के) इतकी झाली आहे. विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांनी राबविलेल्या मतदार नोंदणी शिबिरांमुळे या वयोगटाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.

येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक व परिपूर्ण असण्यावर मा.भारत निवडणुक आयोगाचा भर आहे. त्यानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी जुलै ते ऑगस्ट 2023 या कालावधीत घरोघरी सर्वेक्षणाची मोहिम राबविण्यात आली होती. या सर्वेक्षणात आढळलेल्या मृत मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरित मतदार तसेच दुबार मतदार यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही पुनरिक्षणपूर्व कालावधीत तसेच विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कालावधीत पूर्ण करण्यांत आली.  त्यानुसार 36 हजार 524 मृत मतदारांची नांवे मतदार यादीतून वगळण्यात आली.  त्याचप्रमाणे मतदार याद्यामध्ये 19 हजार 658 एकसारखे फोटो असलेले मतदार (फोटो सिमिलर एन्ट्रीज-PSE ) असल्याचे निदर्शनास आले, त्यांची सखोल तपासणी करुन विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कालावधीत 6 हजार 517 मतदारांच्या नावांची वगळणी करण्यांत आली आहे. तसेच मतदार यादीत नाव व इतर काही तपशील समान असलेले (डेमोग्राफिकल सिमिलर एन्ट्रीज DSE) 9 हजार 314 मतदार आढळून आले. त्यांची सखोल तपासणी करुन 3 हजार 259 मतदारांची नांवे वगळण्यात आली आहेत.  ही वगळणी प्रक्रीया मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित मतदारांच्या गृहभेटी घेऊन, स्पीड पोस्टाने नोटिसा पाठवून तसेच पूर्ण तपासणीअंती कायदेशीररित्या करण्यात आली आहे. नाव वगळणीच्या या प्रक्रीयेमुळे मतदार यादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होवून आता ती अधिक परिपूर्ण झाली आहे. मतदार यादी जितकी सर्वसमावेशक तितकी वंचित समाजघटक लोकशाही प्रक्रीयेत सहभागी होण्याची शक्यता वाढते. रायगड जिल्हयात कातकरी आदिवासी वाडी व वस्त्यामध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

दिव्यांग मतदारांना ये-जा करण्याच्या दृष्टीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  यंदाच्या पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणीसाठी 1 जानेवारी या नेहमीच्या अर्हता दिनांकासोबत दि.01 एप्रिल, दि.01 जुलै, आणि दि.01 ऑक्टोबर या बहुअर्हता तारखा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ऑक्टोबर 2024 पर्यंत 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवांनाही या मोहिमेत आगाऊ किंवा पूर्व नोंदणी (Advance Registration) करता आली. पूर्वनोंदणीचे एकूण अर्ज 9 हजार 72 (1 एप्रिल 2 हजार 453, 1 जुलै- 3 हजार 705, 01 ऑक्टोबर 2 हजार 914) प्राप्त झालेले आहेत. त्या-त्या तिमाहीच्या कालावधीत 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या अर्जदारांच्या अर्जावर प्रक्रीया करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्व नोंदणी केलेल्या युवांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र अंतिम यादी प्रसिध्द झाल्यानंतरही मतदार नोंदणीची निरंतर अद्यतन (Continuous Updatation) प्रक्रीया सुरु असल्यामुळे अद्याप नाव नोंदणी न केलेल्या युवांना मतदार नोंदणीची अजूनही संधी आहे.

दि.23 जानेवारी 2024 रोजी मा. मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयाच्या आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. मतदारांनी मतदाता सेवा पोर्टल या संकेतस्थळावर (https://electoralsearch.eci.gov.in/) जाऊन यादीत आपले नाव तपासावे आणि सर्व तपशील योग्य आहेत का हे पाहावे. सोबतच मतदान केंद्र सुध्दा तपासून घ्यावे, जेणेकरुन ऐन मतदानाच्या दिवशी गैरसोय होणार नाही तसेच यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरुन आपला मताधिकार सुनिश्चित करावा. सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षामार्फत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीच्या नियुक्त्या करुन त्यांच्या माध्यमातून मतदारांना यादीत नाव तपासण्यास आणि नावे नसलेल्यांना मतदार नोंदणीस सहाय्य करावे, नागरिकांना मतदार नोदणी कार्यालयात प्रत्यक्ष मतदार नोंदणी करता येईल. तसेच मतदाता सेवा पोर्टल आणि वोटर हेल्पलाईन अॅप यावर ऑनलाईन नांव नोंदणीची सुविधा सुध्दा उपलब्ध आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक