स्टील स्लॅग रोड तंत्रज्ञान सीएसआयआर-सीआरआरआय महामार्ग बांधणीसाठी विकसित केलेले मजबूत आणि पर्यावरणास अनुकूल असे तंत्रज्ञान -- सदस्य निती आयोग डॉ.व्ही.के.सारस्वत.

 


 

          रायगड,दि.13 (जिमाका) :-"स्टील स्लॅग रोड तंत्रज्ञान हे CSIR- सेन्ट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालया द्वारे विकसित केलेले तंत्रज्ञान आहे, जे स्टील उद्योगातील वेस्ट चे वेल्थ मध्ये परिवर्तन करत आहे व हे तंत्रज्ञान भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास संपूर्ण देशात टिकाऊ आणि पर्यावरणास अनुकूल राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात मदत करेल, असे प्रतिपादन सदस्य निती आयोग डॉ.व्ही.के. सारस्वत यांनी आज येथे केले. NH-66 मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पहिल्या राष्ट्रीय महामार्ग स्टील स्लॅग रोड सेक्शनच्या उद्घाटन प्रसंगी वेळी ते बोलत होते.

               यावेळी मुख्य महाव्यवस्थापक तथा प्रादेशिक अधिकारी, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण मुंबई अंशुमाली श्रीवास्तव, जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जी.एस.राठोड, प्रकल्प संचालक तथा प्रमुख शास्त्रज्ञ, सीएसआयआर-सीआरआरआय सतीश पांडे, सीएसआयआर-सीआरआरआय संचालक डॉ.मनोरंजन परिदा यांच्यासह जेएसडब्ल्यूचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

  

               यावेळी डॉ.व्ही.के.सारस्वत म्हणाले की, NH-66 मुंबई-गोवाच्या इंदापूर-पनवेल विभागावरील 1 किमी लांबीचा "स्टील स्लॅग रोड सेक्शन" सीएसआयआर-सीआरआरआय च्या तांत्रिक मार्गदर्शनाने जेएसडब्ल्यू स्टीलने बांधला आहे. तसेच या रस्त्याच्या बांधकामासाठी सीएसआयआर-सीआरआरआय च्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली जेएसडब्ल्यू स्टील डोलवी, रायगड प्लांटमधून सुमारे 80,000 टन CONARC स्टील स्लॅगचे प्रक्रियाद्वारे स्टील स्लॅग खडीमध्ये परिवर्तन केले गेले आहे. या स्टील स्लॅग खडी ही पारंपारिक पद्धतीने प्रक्रियेद्वारे तयार केलेल्या खडीपेक्षा अधिक सरस असून सदरील खडीमध्ये विविध यांत्रिक गुणधर्म हे जास्त आहेत.  या स्टील स्लॅग खडी रस्त्याच्या प्रत्येक थरामध्ये बांधणीसाठी वापरलेली आहे. या रस्त्यामध्ये कॅरेजवेच्या दोन्ही बाजूंना बिटुमिनस आणि सिमेंट काँक्रीट स्टील स्लॅग सेक्शन आहेत. सर्व थरांमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामासाठी प्रक्रिया केलेले स्टील स्लॅग एग्रीगेट्स आणि स्लॅग सिमेंट वापरणारा हा जगातील अशा प्रकारचा पहिला रस्ता आहे.

               मुख्य महाव्यवस्थापक तथा प्रादेशिक अधिकारी, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, मुंबई अंशुमाली श्रीवास्तव यांनी माहिती देताना सांगितले की, स्टील स्लॅग रोड सेक्शन, त्याच्या नाविन्यपूर्ण तांत्रिक वैशिष्ट्यांसाठी आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरवण्यात आले आहे. तसेच सदरील तंत्रज्ञानास भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडून देखील प्रशंसा मिळाली आहे.

               या कार्यक्रमात बोलताना जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जी.एस.राठोड यांनी सांगितले की, जेएसडब्ल्यू लिमिटेड शाश्वत वाढीसाठी नवीन तंत्रज्ञानाचे अंगीकरण करण्यात नेहमीच आघाडीवर आहे. त्यांनी सीएसआयआर-सीआरआरआय च्या प्रयत्नांची आणि NHAI ने दिलेल्या पाठींब्यासाठी प्रशंसा केली.  

               तसेच सीएसआयआर-सीआरआरआय  संचालक डॉ. मनोरंजन परिदा यांनी सांगितले की, सीएसआयआर-सीआरआरआय  सध्या स्टील मंत्रालयाने प्रायोजित केलेल्या रस्ते बांधणीत प्रक्रिया केलेल्या स्टील स्लॅगच्या वापरासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यावर काम करत आहे. सीएसआयआर-सीआरआरआयने विविध स्टील उद्योगांच्या सहकार्याने गुजरात, झारखंड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये रस्ते बांधणी प्रकल्पांमध्ये स्टील स्लॅगचा वापर यशस्वीपणे राबविला आहे.

               प्रकल्प संचालक तथा प्रमुख शास्त्रज्ञ, सीएसआयआर-सीआरआरआय सतीश पांडे यांनी सदरील तंत्रज्ञानाचे विविध फायद्या बाबत माहिती दिली. तंत्रज्ञान वापरामुळे NH 66 वरील बिटुमिनस स्टील स्लॅग रोड हा पारंपारिक पद्धतीने बांधण्यात येणाऱ्या बिटुमिनस रस्त्याच्या तुलनेत 28 टक्के कमी जाडीने बांधला आहे तसेच सिमेंट काँक्रीट सेक्शन सुद्धा त्याच पद्धतीने बांधला आहे. बिटुमिनस आणि सिमेंट काँक्रीट या दोन्ही रस्त्यांच्या भागांमध्ये पारंपारिक पद्धतीने बांधण्यात आलेल्या रस्त्यांची तुलनेत अंदाजे 32 टक्के खर्चाची बचत होते.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक