समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध --महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय परेड मैदानात महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

 


 

रायगड,दि.26(जिमाका):- समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार, दुर्बल घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे पर्व निरंतर सुरु रहावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी  केले.

  पोलीस मुख्यालयाच्या मैदानात भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.  याप्रसंगी आयोजित दिमाखदार सोहळ्यात जिल्ह्यातील नागरिकांना संबोधित करताना त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड , जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के,  उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) विठ्ठल इनामदार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे,  कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग जगदीश सुखदेवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. एस. हरळय्या, आदी मान्यवर व इतर अधिकारी,कर्मचारी, नागरिक, पत्रकार, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

              सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी 75 व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

               या सोहळ्याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपल्या राज्याच्या विकासाचा अध्याय  सुरू आहे.पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच सर्वसामान्य माणसाच्या जीवनात गुणात्मक बदल घडून येतील, असे लोककल्याणकारी निर्णय घेऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी या सरकारने सुरू केली आहे.   

महाराष्ट्र ही पुरोगामी विचारांची, समता-बंधुता एकता या मूल्यांना आदर्श मानणारी भूमी आहे.  या आदर्शाना प्रमाण मानूनच राज्यातील गरीब, वंचित, उपेक्षित समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत.  या योजना, अभियाने आणि उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यात येत असल्याचे कु.तटकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्याची संधी रायगडकरांना  मिळाली ही अतिशय गौरवाची बाब असल्याचे सांगून शिवाजी महाराजांनी  दाखविलेल्य मार्गावर राज्य शासन वाटचाल करीत असून सुशासनासाठी  सर्वजण बांधिल असल्याचे सांगितले.

कु. तटकरे पुढे म्हणाल्या, शासन आपल्या दारी' या मोहिमेचा जिल्हास्तरीय कार्यक्रम दिमाखदार झाला. या अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील चालू आर्थिक वर्षात विविध शासकीय विभागांमार्फत 25 लाख 37 हजार 51 पात्र लाभार्थ्यांना सतराशे चौदा कोटी त्रेसष्ट लाख अठरा हजार इतक्या रक्कमेचे थेट लाभ देण्यात आलेले आहेत. त्या व्यतिरीक्त विविध प्रकारचे दाखले, परवाने, प्रवास सवलती तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्य वितरण या माध्यमातून 2 कोटी 11 लाख 30 हजार 328 लाभार्थ्यांनाही लाभ दिलेले आहेत. विविध विभागांनी समन्वयाने आणि एकजुटीने नागरिकांना हे लाभ दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाचा नाव लौकीक वाढला आहे असे सांगून त्यांनी या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच

सीसीटीएनएस (Crime and Criminal Tracking Network System) कार्यप्रणाली मध्ये रायगड पोलिसांनी सन 2022, 2023 मध्ये उत्तम कामगिरी बजावल्या बद्दल तसेच जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अंदाजे 333 कोटी रुपये किंमतीचा अमली पदार्थ साठा जप्ती आणि अवैध शस्त्रसाठा पकडण्याची मोठी कामगिरी केली आहे त्याबद्दल पोलीस दलाचे अभिनंदन केले.

रायगड आणि मुंबईच पुर्वापार घट्ट नातं आहे. हे नातं आता अटल सेतू या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळं आणखी दृढ होते आहे. मुंबई आणि रायगड जिल्ह्याला हा जोडणारा सागरी सेतू या जिल्ह्याच्या विकासालाही गती देईल, असा विश्वास असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

अटल सेतूच नाही. तर नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ, विरार-अलिबाग क़ॉरिडार, नवी मुंबई मेट्रोचं विस्तारणारं जाळं हे या परिसराचा कायापालट करून टाकणारे, गेमचेंजर प्रकल्प ठरतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधी पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नरत असल्याचे सांगून त्यांनी मंत्रालयात ‘रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग’ आणि त्यावरच्या धरमतर पूलासंबंधी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आढावा बैठक घेवून कामाला गती देण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले.

रेवस रेड्डी सागरी महामार्गाच्या संरेखेवर असणाऱ्या  आगरदांडा आणि दिघी यांना जोडणाऱ्या आगरदांडा खाडीवर दोनपदरी मोठ्या खाडी पुलाचे बांधकाम करण्याच्या कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचे कु. तटकरे यांनी सांगितले.

 पालकमंत्री असताना जिल्ह्याच्या विकासासाठी घेतलेले निर्णय जसे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाचे बळकटीकरण, दिवेआगार येथील विस्तारीत सुपारी संशोधन केंद्र, रातवड येथील मेगाक्लस्टर प्रकल्प, माहिती भवन यांचा सातत्याने पाठपुरावा करुन पूर्तता करण्यावर भर असल्याचे ही कु तटकरे यांनी सांगितले.

गेली 50 वर्षे महाराष्ट्राचा विकास मुंबईमुळे झाला, तर, पुढची 25 वर्षे महाराष्ट्राच्या विकासाचे केंद्र रायगड जिल्हा हा असणार आहे. या भागात तिसरी मुंबई तयार होत आहे. त्यासाठी आवश्यक दळणवळणाची साधने उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगून त्यांनी मुलींना लखपती करणाऱ्या 'लेक लाडकी' योजनेची आणि 'नारी शक्ती दूत' मोबाईल अॅप्लिकेशन ची माहिती दिली.  महिला सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या या ॲपचा जास्तीत जास्‍त महिलांना उपयोग करुन घ्यावा, असे  आवाहन कु. तटकरे यांनी यावेळी केले.

रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्याला, बळीराजाला बळ देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, 'नमो शेतकरी सन्मान निधी योजना' 'शेततळे योजना', 'जल युक्त शिवार योजना', 'एक रुपयात पीक विमा योजना' यांसारख्या महत्वकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान (PM-JANMAN) अंतर्गत रायगड जिल्ह्यात प्रभावी काम झाले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून 156 लहान-मोठ्या उद्योगांना एकत्रित आणून  कर्ज व सबसिडी उपलब्ध करून देण्यात आली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.  नैसर्गिक आपत्ती, संकटांमध्ये जिल्हा प्रशासन दक्ष राहून सर्व सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम करते.तसेच वेळोवेळी ndrf आणि विविध सामाजिक संस्था मदतीला धावून येतात. ही अतिशय समाधानकारक गोष्ट आहे. जिल्हा प्रशासनाला बळ देण्याबरोबरच आपत्तीग्रसतांच्या पाठीशी राज्य शासन सदैव खंबीर असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला..

पुरस्कार्थींची नावे पुढीलप्रमाणे :- गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार- श्री.अभय शंकर घरत, पंतनगर,अलिबाग (राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्स लि.थळ), संदिप गजानन पिसाळ, आर.सी.एफ.कॉलनी (राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्स लि. थळ), श्री.उमेश वामन जाधव, सुधागड (विभा हॉस्पिलिटी सर्व्हिस आशापुरा धाम वाशी सानपाडा, नवी मुंबई).

            महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेमध्ये यश संपादन केलेल्या कु.सोनाली राजेंद्र तेटगुरे (B.Tech) ढालघर, ता. माणगाव, जि. रायगड, कु.अक्षता अशोक अडागळे, ता. म्हसळा, जि. रायगड यांना गौरविण्यात आले. 

"महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाचे जिल्हास्तरीय विजेते (पुरस्काराचे स्वरुप रोख 1 लाखाचा धनादेश व प्रशस्तीपत्र) मोहम्मद अनास रफिक मेमन, खान मोहम्मद अकदूस खलिद, कांबळे सत्विक संतोष.

 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या ACTREC Hospital (Advance Centre for Treatment Research & Education in Cancer, Shri Satya Sai Sanjeevani Centre for Child Heart Care Kharghar रुग्णालयांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

            शिक्षण विभाग (माध्यमिक), रायगड जिल्हा परिषद:- कु.परमेश्वरी प्रशांत वेदक, गो.म.वेदक विद्यामंदिर तळा (ऑनलाईन जर्मन लँग्वेज एक्झाममध्ये देशात पहिली), कु.मोनिका संदीप बाबर,जानकीबाई रघुनाथ हळदवणेकर कन्याशाळा अलिबाग (50 वे राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन क्रिडा प्रबोधिनी बालेवाडी), कु.परी संदेश काटकर, आर.सी.एफ सेंकडरी अॅण्ड ज्युनिअर कॉलेज कुरुळ, अलिबाग (50 वे राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन क्रिडा प्रबोधिनी बालेवाडी), कु.स्वरा अविनाश पाटील, चिंतामण केळकर विद्यालय,अलिबाग (50 वे राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन क्रिडा प्रबोधिनी बालेवाडी), कु.अवधुत संदीप वारगे, आर.सी. एफ सेंकडरी अॅण्ड ज्युनिअर कॉलेज कुरुळ, अलिबाग, (50 वे राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन क्रिडा प्रबोधिनी बालेवाडी)

 गारोदर मातांना बेबी केअर किट वाटप :-श्रीम.योगिता अशोक पाटील.  अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप-श्रीम. वैजयंती विशाल पाटील, श्रीम.विजयश्री विलास पाटील, श्रीम.दिप्ती जितेंद्र पाटील, श्रीम. सुकेशिनी दांडेकर, श्रीम.वैष्णवी मुकादम.

००००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक