नवमतदार नोंदणी हा राष्ट्रीय मतदार दिनाचा मुख्य उद्देश--जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे



 

रायगड,दि.25(जिमाका):- लोकशाहीचा सर्वात सक्षम घटक मतदार असून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजाविला पाहिजे. प्रत्येक नागरिकाने आपण मतदार असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे, असे सांगून आजच्या युवा पिढीला लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मतदार नोंदणी आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी केले.

जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक साक्षरता मंडळ,जेएसएम कॉलेज अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने  14 वा राष्ट्रीय मतदार दिन नियोजन भवन येथे साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

            व्यासपीठावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, जेएसएम कॉलेजच्या प्राचार्य डॉ.सोनाली पाटील,  निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे, अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनाचे अध्यक्ष साईनाथ पवार, युवा प्रतिनिधी तपस्वी गोंधळी यांसह मान्यवरांसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागातील अधिकारी, कर्मचारी, जेएसएम महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 लोकशाही सुदृढ बनविण्यासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व युवक युवतींनीआपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ठ करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ म्हसे यांनी यावेळी केले.

जेएसएम महाविद्यालयाच्या प्राचार्या  डॉ.सोनोली पाटील यांनी जिल्ह्याच्या मतदार यादीमध्ये स्त्रीयांचा वाढलेला टक्को ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगून सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

अनेकांचा झाला सन्मान

             रायगड जिल्ह्यामध्ये मतदार जनजागृती करण्यामध्ये वेगवेगळ्या शासकिय यंत्रणेसह, वेगवेगळी सामाजिक, व अन्य संस्था, पत्रकार यांनी योगदान दिले. त्याबद्दल मतदार नोंदणी अधिकारी डॉ.ज्ञानोबा बानापुरे, सहाय्य मतदार नोंदणी अधिकारी विक्रम पाटील, निवडणूक नायब तहसिलदार यु.डी.अंधेरे, अजित टोळकर यांना सन्मानित करण्यात आले.  या संपूर्ण प्रक्रियेत व्यापक  प्रसिध्दीसाठी सहकार्य केल्याबद्दल दैनिक पुढारीचा सन्मान करण्यात आला. नूतन मतदार, तृतीयपंथी मतदार, उत्कृष्ट काम केलेले महाविद्यालय, सामाजिक संस्था तसेच विविध स्पर्धेतील विजेत्यांचा जिल्हाधिकारी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.  

मतदारांनी घेतली शपथ

उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांनी उपस्थित सर्वांना मतदार दिवसाची प्रतिज्ञा दिली. आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु."अशी  प्रतिज्ञा सर्वांनी यावेळी केली.

 

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक