मच्छिमार बांधवाच्या प्रलंबित प्रस्तावांना गती देणार --महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे

 


        

रायगड (जिमाका) दि.2 :- रायगड जिल्ह्यातील मच्छिमार बांधवाच्या समस्या, प्रस्तावांना गती देण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल तसेच सर्व लोकप्रतिनिधी समवेत मंत्री मत्स्यव्यवसाय यांच्याकडे बैठक घेण्याचे आश्वासन   अलिबाग मच्छिमार सहकार सोसायटीच्या 75 व्या अमृत महोत्सव वर्धापन दिन सोहळ्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिले.  

अलिबाग येथील जुनी मच्छिमार मैदान येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.  यावेळी सहायक मत्स्य व्यवसाय संजय पाटील, तहसिलदार अलिबाग विक्रम पाटील, मच्छिमार सोसायटीचे चेअरमन विशाल बना यांसह संचालक मंडळ आणि  रायगड जिल्ह्यातील विविध मान्यवर उपस्थित होते.

महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, स्वातंत्रोत्तर काळात मच्छिमार बांधवाच्या समस्या सोडविण्यासाठी या सोसायटीची स्थापना करण्यात आली.  यंदाचे वर्षे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे ही आनंदाची बाब आहे. या निमित्ताने सर्व मच्छिमार बांधवांना शुभेच्छा देते.  ही सोसायटी केंद्र शासनाकडे नोंदणीकृत संस्था असून गेल्या 75 वर्षामध्ये मच्छिमारांचे अनेक प्रश्न समस्या सोडविण्यात आल्या आहेत. 

रायगड जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांना नैसर्गिक आपत्ती, करोना तसेच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानेही डगमगून न जाता कोळी बांधव खंबीरपणे उभे आहेत. या सर्व बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. डिझेल परतावा, जेट्टी, पर्सेनेट जाळे या सर्व समस्यांबरोबर मच्छिमार सोसायटीच्या निवेदनाच्या अनुषंगाने मंत्रालय स्तरावर बैठक घेण्यात येईल, असे कु. तटरके यांनी यावेळी सांगितले. सुकी मासळीचे वेगवेगळे पदार्थ तयार करावेत त्या पदार्थाना मागणी आहे. सुक्या मासळीपासून पदार्थ तयार करुन त्यांना प्रशिक्षण देवून बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. त्यासाठी सोसायटीने सहकार्य करावे. चार महिने मासेमारी बंद असते त्याकाळात पूरक व्यवसाय करता येवू शकतो.   यासाठी सोसायटीने पुढकार घ्यावा, असेही कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले. तसेच मच्छिमार बांधवाच्या समस्या सोडविण्यासाठी कायम स्वरुपी प्रयत्नशील राहणार असल्याचेही कु.तटकरे यांनी यावेळी सांगितले.  यावेळी सोसायटीचा लेखाजोखा मांडणाऱ्या संगम पुस्तिकेचे प्रकाशन कु.तटकरे यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी मच्छिमार सोसायटीचे चेअरमन विशाल बना यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.

वात्सल्य शिशुगृहास भेट

         अलिबाग येथील वात्सल्य शिशुगृहास महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी भेट देवून पाहणी केली.  तसेच येणाऱ्या अडीअडचणींबद्दल माहिती घेतली. या शिशुगृहामार्फत अनाथ बालके दत्तक देण्याची कार्यवाही केली जाते. दत्तक प्रक्रिया सुलभ करुन त्यातील समस्यांचे निराकरण करणे तसेच संस्था दत्तक मुक्त करण्यासाठी सद्यस्थितीत असलेल्या बालकांच्या दत्तक प्रक्रियेची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना कु.तटकरे यांनी यावेळी दिल्या.  तसेच या प्रकरणांमध्ये पोलीस यंत्रणेकडून उशीरा अहवाल प्राप्त होवू नये, तसेच प्रत्येक बालकाच्या केसचा अभ्यास करुन अंतिम अहवाल पोलीसांनी लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याचा सूचना संबंधित पोलीस यंत्रणेला दिल्या.

यावेळी वात्सल्य शिशुगृहाच्या प्रकल्प प्रमुख शोभा जोशी, जिल्हा व बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे, उप प्रकल्प प्रमुख सुजाता मेहंदळे यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक